तृतीयपंथींतर्फे कल्याणमध्ये १० रुपयांत जेवण, १ रुपयांत नाश्ता; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘गरीब थाळी’ला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:44 PM2022-09-07T12:44:31+5:302022-09-07T12:46:24+5:30
फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
कल्याण : कल्याणमध्ये तृतीयपंथींच्या ख्वाहिश फाऊंडेशनच्यावतीने गरीब थाळी सुरू करण्यात आली आहे. या केंद्राचा प्रारंभ मंगळवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दहा रुपयांत थाळी आणि एक रुपयांमध्ये नाश्ता दिला जाणार आहे.
फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदिवासी, गरीब, गरजू विधवा आणि तृतीयपंथींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीयपंथी बारावीची आणि तीन जण बी.कॉम.ची परीक्षा देणार आहेत. किन्नर, गरजू, विधवा आणि आदिवासी निराधारांना आसरा नाही. त्यांच्यासाठी मुरबाड येथे दहा एकर जागा आहे. त्याठिकाणी निवारा उभारण्यासाठी बांधकाम साहित्याची गरज आहे. ते देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्षा मन्सुरी यांनी यावेळी केली.
६५ वर्षीय तृतीयपंथींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीत ठाणे अव्वल
जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यात रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे. राज्यभरातून ठाणे जिल्ह्यात ७८२ तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात अव्वल ठरला आहे.