कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग, तरुणासह नागरिकांनी धाडस दाखविल्याने वाचले दुकानदाराचे प्राण
By मुरलीधर भवार | Published: December 30, 2023 03:55 PM2023-12-30T15:55:36+5:302023-12-30T15:55:58+5:30
शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली.
कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता घडली. आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांनी पळापळ सुरू केली. एका तरुणासह नागरिकांनी धाडस दाखवीत दुकानात अडकलेल्या मालकास बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
गुरुदेव हाॅटेलनजीक साई विहार इमारत आहे. या इमारतीत वाणिज्य दुकानं आणि सरकारी कार्यालये आहेत. या इमारतीत ललित मेडिकलचे दुकान आहे. या दुकानात अचानक धूर येऊ लागला. आधी नागरिकांना वाटले की, दुकानाच्या मागे कोणी तरी कचरा जाळला असावा त्यामुळे धूर निघत असावा; मात्र धुराचे लोट येऊ लागले. धूर इतका जास्त होता, की ते पाहून दुकानात आग लागल्याचे लक्षात आले.
आग लागल्याचे कळताच दुकानदाराला वाचविण्याकरिता प्रतीक दाते याने नागरिकांच्या मदतीने दुकानात शिरण्याचे धाडस दाखविले. प्रतीक आत शिरला. दुकानात सर्वत्र धूरच धूर पसरला असल्याने दुकानमालकाचा हात प्रतीकच्या हाताला लागला. त्यामुळे प्रतीकच्या लक्षात आले की, त्या ठिकाणी दुकानदार आहे. त्याने दुकानदाराला नागरिकांच्या मदतीने दुकानातून बाहेर काढले. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बँकेच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहेत. आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.