मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश

By मुरलीधर भवार | Published: November 24, 2023 07:24 PM2023-11-24T19:24:38+5:302023-11-24T19:24:56+5:30

या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते.

Metro 12 tender will be announced in next two days |  मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश

 मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर होणार; MMRDA बैठकीत खासदार शिंदेंच्या मागणीला यश

कल्याण: संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीने करण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मांडली. त्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करून त्यात सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली. सोबतच ठाणेपल्याडच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून यामुळे ठाणेपल्याड वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच महत्वाकांक्षी मेट्रो १२ ची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एमएमआरडीएच्या मुख्यालयात आज खासदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महानगर आयुक्तांसह एमएमआरडीएचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडने जोडण्यासाठीची संकल्पना आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत मांडली. त्यावर एमएमआरडीए प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटांत वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालवा लागतो.

सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणे आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे सांगत यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. तसेच या कामी सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घ्यावी, असे आवाहन खासदार शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केले. त्यावरही एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. या संकल्पनेची अमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.
 
कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार असून त्याची निविदा येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून या निविदे नंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
 
शहरांच्या वेशीवरून किंवा शहरातून जाणारे राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना जोडल्यास वाहतुकीचे नवे जाळे निर्माण होईल. सध्या वाहन चालकाला शहराबाहेर पडण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ वाचेल. शहरांतर्गत वाहतुकीचा भारही कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे पल्याडच्या शहरांमध्ये ही संकल्पना राबवण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या वाहतूक संलग्नतेसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची मागणी केली असून त्यावर एमएमआरडीए प्रशासन सकारात्मक आहे. तर मेट्रो १२ ची निविदाही येत्या दोन दिवसात जाहीर होणार आहे. - डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा

Web Title: Metro 12 tender will be announced in next two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.