एमआयडीसीची जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया
By मुरलीधर भवार | Published: May 23, 2023 07:32 PM2023-05-23T19:32:53+5:302023-05-23T19:33:09+5:30
काटई-अंबरनाथ राेडलगत असलेली एमआयडीसीची भली मोठी जलवाहिनी फुटल्याची घटना आज घडली.
कल्याण : काटई-अंबरनाथ राेडलगत असलेली एमआयडीसीची भली मोठी जलवाहिनी फुटल्याची घटना आज घडली. या वेळी फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. हा प्रकार कळताच एमआयडीसीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम करणारे पथक पाठविले. या पथकाने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ही जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबईतील काही भागातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिमाण होणार आहे.
१७०० मिली मिटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या जलवाहिनीला अचानक आज तडा गेल्याने जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. कल्याण डोंबिवली भागासह ग्रामीम भागातून जाणाऱ्या एमआयीसीच्या बड्या जलवाहिन्या वारंवार फुटण्याचे प्रकार घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीने जलवाहिन्या दुरुस्तीचे आणि काही ठिकाणी जुन्या जलवाहिन्या बदलून त्याठिकाणी नव्या जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले होते.
मात्र तरी देखील हे प्रकार घडतात. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून एमआयडीसीकडून पाणी पुरवा केला जातो. अनेक अंबरनाथ फॉरेस्ट नाका ते नवी मुंबई त्याचबरोबर कल्याण शीळ रोड लगत असलेली बडी जलवाहिनी आहे. या जलवाहिन्यावर अनेकांनी बेकायदा बांधकाम करुन ढाबे थाटले आहेत. त्या हॉटेल आणि ढाब्यांना जाण्याकरीता जलवाहिनीवरुन सिमेंटचे रस्ते तयार केले आहेत. काही जणांनी बेकायदेशीरपणे जलवाहिन्यांवर टॅपिंग करुन बेकायदेशीरपणे पाणी कनेक्शन घेऊन पाण्याची चोरी करीत आहेत. याच बेकायदेशीर पाणी कनेक्शनच्या जोरावर गाड्या धुण्याकरीता सर्व्हीस सेंटर सुरु आहेत.