डोंबिवलीचा मिलापनगर परिसर पांघरणार हिरवा शालू; पक्षी, कीटकांना मिळेल आसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:31 AM2024-03-29T11:31:53+5:302024-03-29T11:32:53+5:30
नेतीवली टेकडी,एमआयडीसीमधील मिलापनगर परिसरात शहरी वन प्रकल्प (सिटी फॉरेस्ट) ही संकल्पना लवकरच राबवणार आहे.
अनिकेत घमंडी, डोंबिवली : नेतीवली टेकडी,एमआयडीसीमधील मिलापनगर परिसरात शहरी वन प्रकल्प (सिटी फॉरेस्ट) ही संकल्पना लवकरच राबवणार आहे. नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास या संस्थेची संकल्पना असून संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील पुणतांबेकर हे त्यासंदर्भात शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिक, आर्किटेक, आरसीसी कन्सल्टंट अशांचा सहभाग, सहकार्यातून तो प्रकल्प साकारणार आहेत.
मिलापनगरमध्ये सोनारपाडापर्यंत तसेच कल्याण-शीळ मार्गाच्या सर्व्हिस रस्त्यालगतच्या हाय टेन्शन वायर खालील मोकळ्या भूखंडावर विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत.
कृती आराखडा करणार तयार-
या योजनेंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. ठरवलेल्या जागांमध्ये वनसंवर्धनाची जबाबदारी निश्चित केल्याचे सांगण्यात आले. वृक्ष लागवड, त्यांचे संगोपन, वनांचे व्यवस्थापन करण्यासाठी समिती राहणार आहे. ही समिती सूक्ष्म तसेच कृती आराखडा तयार करणार आहे. नेतीवली टेकडीवर पूर्वी झाडे होती. नंतर तेथे घरे बांधल्यामुळे ही टेकडी भकास वाटू लागली. आता पुन्हा ही टेकडी हिरवीगार होणार आहे.
पक्षी, कीटकांना मिळेल आसरा-
१) पक्षी, कीटक आर्दीना आसरा मिळेल, सावली मिळेल, ग्लोबल वॉर्मिंग ही जागतिक समस्या असून त्यापासून बचाव करण्यासाठी अशा शहरी वन प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.डॉ. पुणतांबेकर यांनी पुढाकार घेऊन शहरातील आर्किटेक राजीव तायशेटे,
२) आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडी, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अविनाश कुबल यांसह विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमी या उपक्रमात सहभागी होत आहेत.
३) पुणतांबेकर यांनी तायशेटे यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार एमआयडीसी भागात पर्यावरण संतुलन राखणारा बफर झोन असावा यादृष्टीने शहरी वन प्रकल्प राबवण्याचे ठरवले. नेतीवली टेकडीही हिरवीगार करण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे.
४) पूर्वी त्या टेकडीवर भरपूर झाडे होती. परंतु हळूहळू ती टेकडी भकास वाटू लागली असून त्या ठिकाणी दाट झाडी विरळ होत आहेत. त्यामुळे टेकडीचे संवर्धन करून ती हरित करण्याचा उद्देश आहे. टेकडीवर आताही चांगली झाडे असून तेथे पाण्याचीही व्यवस्था आहे. तेथे ठिबक सिंचन राबविण्याबाबत आणि झाडे लावण्याचा मानस आहे.
५) नेतीवली टेकडीवर पर्यावरण राखणे, वाढवणे यासाठी पालिका अधिकारी तसेच एमआयडीसीचे डोंबिवली, ठाणे विभागही सहकार्य करत आहेत.