खड्डे बुजविले नाही तर सरकार खड्ड्यात गेल्या शिवाय राहणार नाही; रामदास आठवले यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:07 PM2021-10-03T17:07:02+5:302021-10-03T17:07:50+5:30
"या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे."
कल्याण - राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली. या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे. खड्डे बुजविण्याचे काम केले जात नाही. खड्डे जर बुजविले नाही, तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लक्ष द्यावे, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हटले आहे. (Minister Ramdas Athawale Target Uddhav thackeray government over Potholes in kalyan)
केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन डोंबिवली बलात्कार प्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते पक्षकारांशी बोलत होते.
फिल्म इंडस्ट्रीला ड्रग्जची लागण -
जहाजावर पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच एनसीबीने छापा टाकाला. कारवाई केली. या कारवाईत शहारुख खानचा मुलगा असो किंवा कुणीही असो. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीजला ड्रग्जची लागण झालेली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईही ड्रग्ज मुक्त झाली पाहिजे, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
राज्यावर अनेक प्रसंग राज्य सरकारकडून केवळ आश्वासन -
मराठवाड्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील पिके पावसामुळे उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यासाठी राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. कोकणातही अशा प्रकारचे संकट आले होते. नाशिकमध्येही द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे. राज्यावर अनेक प्रसंग आले असताना राज्य सरकारकडून केवळ आश्वासनं दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा करुन भरीव मदत दिली पाहिजे याकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.