मिठाईवाला प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी, मिठाईवाला यांच्या संमतीपत्रानुसार मोबदल्याचे वाटप; प्रांत अधिकाऱ्यांची माहिती
By मुरलीधर भवार | Published: December 28, 2022 04:21 PM2022-12-28T16:21:08+5:302022-12-28T16:21:29+5:30
मिठाईवाला यांनी दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून प्राप्त तक्रारीनुसार पुन्हा सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे.
कल्याण- मुंबई वडोदरा मार्गात बल्याणी येथे जागा नसताना मोहम्मद शाहीद मिठाईवाला यांच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीला २ कोटी ८ लाख रुपयांचा मोबदला दिल्याची तक्रार मिठाईवाला यांनी केली आहे. या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी घेतली जाणार आहे. मात्र मिठाईवाला यांनी दिलेल्या संमतीपत्राच्या आधारे मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात आला असून प्राप्त तक्रारीनुसार पुन्हा सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले की, बल्याणी येथे मिठाईवाला आणि सादीक रईस या दोघांनी जागा मालकाकडून करार करुन चाळ वजा घरे बांधली. ही घरे मुंबई वडोदरा महामार्ग प्रकल्पात बाधित होत असल्याने मिठाईवाला यांनीच प्रांत कार्यालयाकडे घरांचा मोबदला मिळावा असा अर्ज केला होता. त्यांच्या मागणी अर्जानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी प्रत्यक्ष जागेवर सव्रेक्षण करुन बाधित बांधकामांचे मूल्यांकन केले. त्यानुसार मिठाईवाला यांना मोबदला देण्याचे ठरले.
मिठाईवाला आणि रईस यांच्यात आपसात करार झाला. मिठाईवाला यांनी नोटरीकरून त्यांचा मोबदला रईस यांना देण्यात यावा असे संमतीपत्र दिले आहे. त्यावर मिठाईवाला यांच्या सह्या आहेत. त्यानुसार मोबदला रईस यांना देण्यात आला आहे. मोबदला वाटप हा प्राप्त अधिकृत कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला आहे. तरी देखील मिठाईवाला यांनी तक्रार केली आहे. तक्रारीच्या आधारे या प्रकरणात शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल. गरज भासल्यास मिठाईवाला यांची सही खरी आहे की नाही याची शहानिशा केली जाईल. त्यांची सही आढळून आल्यास खोटी तक्रार दिल्या प्रकरणी मिठाईवाला यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकतो असे ही प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.