आमदार गणपत गायकवाड यांचे मुक्काम पोस्ट तळोजा जेल
By सदानंद नाईक | Published: February 14, 2024 03:10 PM2024-02-14T15:10:55+5:302024-02-14T15:11:11+5:30
न्यायालयीन कस्टडी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाड यांना सकाळी ९ वाजता न्यायालयात आणले
सदानंद नाईक
उल्हासनगर : पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुधवारी सकाळी ९ वाजता उल्हासनगर न्यायालयात आणलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अन्य चौघांना न्यायालयाने पोलीस कस्टडी ऐवजी न्यायालयीन कस्टडी सुनावली. न्यायालयीन कस्टडी मिळाल्यावर आमदार गायकवाड यांच्यासह अन्य जणांना आधारवाडी ऐवजी तळोजा जेल मध्ये नेण्यात आले.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वेचे शहर प्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दिघेही गंभीर जखमी झाले असून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर, नागेश बेडेकर, रणजित यादव व विक्की गणोत्रा यांच्यासह इतरवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. यापैकी वैभव गायकवाड व नागेश बेडेकर अद्यापही फरार असून इतर ६ जणांना न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली.
आमदार गणपत गायकवाड, संदीप सरवनकर, रणजित यादव, हर्षल केणे यांची १४ फेब्रुवारी रोजी पोलीस कस्टडी संपत असल्याने, त्यांना बुधवारी सकाळी ९ वाजता उल्हासनगर न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवूनही आमदार गायकवाड समर्थक न्यायालय परिसरात एकत्र आले होते. सरकारी वकिलाने पुन्हा पोलीस कस्टडीची मागणी केली. मात्र आमदार गायकवाड यांच्या वकिलांनी जोरदार प्रतिवाद केला. न्यायालयात आमदार गायकवाड यांचे वकील अँड उमर काझी यांनी जोरदार प्रतिवाद केल्याने, न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सूनविली. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाडसह अन्य जणांची रवानगी आधारवाडी जेल ऐवजी तळोजा जेल मध्ये केली आहे. भाजप व शिवसेना या सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मधील वाद चव्हाट्यावर गेल्याने, दोन्ही पक्षाच्या समर्थकात एकमेका बाबत कटुता निर्माण झाली. मात्र लोकसभा निवडणुकी पूर्वी यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतल्याने, गोळीबार प्रकरण काही दिवसातच निवळणार असल्याचेही बोलले जाते.
कट रचून गोळीबार हास्यास्पद
आमदार गणपत गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला. हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. आमदारांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार घेण्यास पोलिसांनी उशीर केला. त्यामुळे हे प्रकरण घडल्याचे आमदार गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.