‘त्या’ पक्षप्रवेशावर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 03:28 PM2021-11-22T15:28:33+5:302021-11-22T15:29:19+5:30
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाकी आहे. भाजपाचे तीन नगरसेवक / नगरसेविका या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यावर आता डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित आम्ही कुठे तरी कमी पडलो अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात भाजपाचे काही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या पक्षप्रवेशावर आज शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं आहे. कल्याणात आज महाविकास आघाडी सरकारविरोधात काढलेल्या मोर्चानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे. भाजपाचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अस सांगत त्यांनी सेनेत जाणाऱ्या नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्याकडूनच पक्षप्रवेशाची माहिती मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता केडीएमसीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणारे सेना आणि भाजप आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.