KDMC युनियनच्या कार्यालयातून मुख्यमंत्र्यांचा काढलेला फोटो पुन्हा लावण्यासाठी आग्रह धरणार!
By मुरलीधर भवार | Published: August 4, 2022 08:38 PM2022-08-04T20:38:35+5:302022-08-04T20:39:28+5:30
आमदार विश्वनाथ भोईर यांची भूमिका
कल्याण: KDMC मुख्यालयात शिवसेना प्रणित म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयातून मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचा फोटो काढल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज्यात अन्य ठिकाणी फोटो काढण्यावरुन उद्रेक सुरु आहे. या ठीकाणी उद्रेक होऊ नये. फोटो पुन्हा लावण्यात यावा यासाठी मी आग्रह धरणार असल्याची भूमिका शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केली आहे.
डोंबिवली शहर शाखेत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला गेला. शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका महिला पदाधिका:याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. हा तपास सुरु असतांना केडीएमसी मुख्यालयात असलेल्या म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनाही शिवसेना प्रणित मान्यता प्राप्त संघटना आहे या संघटनेच्या कार्यालयातून मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो काढल्याची चर्चा जोरात सुरु होती. याबाबत संघटनेकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जेव्हा शिंदे यांना नेते पदावरुन हटविण्यात आले होते. त्याचवेळी त्यांचा फोटो काढला होता.
फोटो काढण्याच्या घटनेला आता बरेच दिवस उलटून गेले आहे. याबद्दल त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु शिंदे गटाचे आमदार भोईर यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनाही ही सर्व कामगारांची संघटना आहे. कामगारांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे जातात. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना पक्षाने गृहीत धरु नये. फोटो काढण्याच्या घटना राज्यभरात होत आहेत. त्यामुळे दोन गटात उद्रेक होत आहेत. कल्याण पश्चिमेत असा कोणता प्रकार नाही. मात्र युनियनच्या पदाधिका:यांची बोलून हा वाद मिटविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. फोटो लावण्यासाठी मी आग्रह धरेन.