ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याच्या मदतीला धावले शिंदे गटाचे आमदार अन् नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 01:46 PM2022-09-29T13:46:56+5:302022-09-29T13:47:55+5:30
राज्यातील पहिली घटना असल्याचा शिंदे समर्थकांचा दावा
कल्याण-ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटीस मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर आणि नगरसेवक हे त्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. आमदार भोईर यांनी कल्याण पाेलिस उपायुक्तांची भेट घेत साळवी यांच्या विरोधात कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये अशी मागणी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारण हे प्रथमच होत आहे की, ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यासाठी शिंदे गटातील आमदाराने मदतीचा पुढे केला आहे.
राज्यात सत्ता संघर्षाची लढाई एकीकडे कोर्टात सुरु असताना दुसरीकडे कल्याणमध्ये एक वेगळे राजकारण पाहावयास मिळाले आहे. काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे कल्याण महानगर प्रमुख आणि कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारची नोटिस पाठविण्यात आली. साळवी यांना पोलिसांकडून त्यांचे प्रतिउत्तरासाठी वेळ देण्यात आली. यावेळी साळवी यांनी ही कारवाई सूडबूद्धीने होत असल्याचा आरोप केला होता. साळवी यांनी शेकडो समर्थकांसह एसीपी कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदविला आहे.
पोलिसात हे प्रकरण सुरु असताना थेट शिंदे गटातील आमदार भोईर शिंदे यांनी नगरसेवकांसोबत पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. माजी नगरसेवक माेहन उगले, रवी पाटील, सुनिल वायले,जयवंत भाेईर, प्रभूनाथ भाेईर आदी उपस्थित हाेते. यावेळी आमदार भोईर यांनी सांगितले की, विजय साळवी आणि आमचे पारिवाराचे संबंध आहे. आम्ही दोघे एकत्रित काम केले आहे. ही कारवाई सूडबुद्धी केली गेली नाही. त्यांच्या विरोधात राजकीय गुन्हे दाखल आहेत. ही रूटीन प्रोसेस आहे. मात्र विजय साळवी यांच्या वर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी पोलिसांनी याची दक्षता घ्यावी. आमदार भोईर यांच्या या पाऊलामुळे राजकीय वतरुळात एकच चर्चा रंगली आहे.