"कल्याण डोंबिवलीच नव्हे तर राज्य खड्डयात गेले"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 04:20 PM2021-10-03T16:20:00+5:302021-10-03T16:23:42+5:30
MNS Bala Nandgaonkar And Shivsena : दोनच दिवसांपूर्वी 25 वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाला खड्डे बुजविता आले नाहीत याकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले होते.
कल्याण - कल्याणडोंबिवलीत खड्डे आहेत असे नव्हे तर राज्य खड्डय़ात गेले असल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असल्याने ते कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त टीका केली. कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक प्रभागातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा शहरातील रस्त्यावरील खड्डे प्रश्न त्यांनी मांडला. महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी नांदगावकर यांनी मोबाईलवरुन संपर्क साधला असता पावसाने उसंत दिल्यावर खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल असे सांगितले.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे की, सत्ताधारी शिवसेनेला असे वाटते की, कल्याण डोंबिवलीतील लोकांना खड्डय़ात टाकले तरी ते लोक आपल्याला सिंहासनावर बसवितील. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, एका घरातील नातू घरातच चोरी करीत असतो. ही गोष्ट त्याच्या आजोबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला घरातून हाकलून दिले. यो गोष्टीचा बोध शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी कायम लक्षात ठेवावी असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी 25 वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाला खड्डे बुजविता आले नाहीत याकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले होते. त्यापश्चात शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी तळागाळात जाऊन कोण काम करते आहे हे लोकांना चांगले माहीत आहे असे वक्तव्य केले होते. त्या पश्चात मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी कल्याण डोंबिवतील खड्डे प्रकरणी ट्वीट केले आहे की, काम कोण करते आणि भ्रष्टाचार कोण करतेय हे लोकांना चांगले माहीत आहे. तुमच्या अंदाधुंद सत्तेला खड्डे पाडून त्यात जनता तुम्हाला बुडविल्याशिवाय राहणार नाही अशी टीका केली आहे.