हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:53 PM2022-04-19T12:53:21+5:302022-04-19T12:53:58+5:30
हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
कल्याण : कल्याण ग्रामीण पाणीटंचाईच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर सोमवारी मनसे आणि भाजपने तहान मोर्चा काढला. यावेळी आयुक्त विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होत्या. काही महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती.
सर्वोदय मॉलपासून काढलेल्या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप माजी नगरसेविका रविना माळी, संदीप माळी, मनसेच्या महिला आघाडी प्रमुख मंदा पाटील आदी असंख्य मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकरी यावेळी ‘ केडी यमसी ’, ‘ आयुक्त माणूस चांगला, मात्र ठाण्याच्या वेशीला टांगला ’, ‘ २५ वर्षे खुर्च्या उबविल्या, मात्र नागरिकांची तहान भागविली नाही,’ असे विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.
आमदार पाटील, चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालनात पोहचले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना पाहून दोन्ही आमदार संतापले. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत ? लोकप्रतिनिधींना आयुक्त आणि प्रशासन फालतू समजतात का? असा संतापजनक सवाल केला. आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. लोकप्रतिनिधींना हलक्यात घेणार असाल, तर महापालिकेस कुलूप लावणार आणि कोण आतमध्ये शिरतो हे पाहणार असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला.
तर, आमदार चव्हाण यांनी पोलिसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पोलिसांनी मोर्चाची कल्पना प्रशासनाला दिली नाही का? असा संतप्त सवाल केला. एक तासाच्या चर्चेनंतर एमआयडीसीचे अधिकारी प्रकट झाले. महापालिकेचे अधिकारी पाण्याचे टँकर विकतात असा आरोप आमदारांनी केला. त्यावरून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
या आहेत मागण्या
टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवा, नव्याने झालेल्या बड्या गृहसंकुलाचा पाणीपुरवठा बंद करा, गोरगरीब जनतेला पाणी द्या, पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारा, या विविध मागण्यांची अंमलबजावणी तातडीने करून या बैठकीचे इतिवृत्त द्यावे, अशी मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी बैठकीत केली.
त्यात गैर काय?
हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.