प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट
By मुरलीधर भवार | Published: September 27, 2022 06:16 PM2022-09-27T18:16:20+5:302022-09-27T18:16:53+5:30
प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट दिला आहे.
कल्याण: मागील 13 वर्षापासून प्रसूतीगृह बंद आहे. वारंवार मागणी करुन देखील सुरु होत नाही. याच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला प्रतिकात्मक पाळणा भेट करीत लवकरात लवकर प्रसूती गृह सुरु करण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्व भागातील श्क्तीधाम कॉम्पलेक्समध्ये प्रसूती गृह होते. मनसे पदाधिकारी विवेक धुमाळ यांचे म्हणणे आहे की, 2009 साली प्रसूतीगृहाच्या दुरुस्तीकरीता प्रसूतीगृह बंद करण्यात आले. 13 वर्षापासून हे प्रसूती गृह बंद आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रसूतीगृह सुरु करण्याची मागणी केली गेली तेव्हा लवकरात लवकर सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्याची पूर्तता झाली नाही. कल्याण पूर्व भागात हे प्रसूतीगृह सुरु झाल्यास त्याचा महिलांना फायदा होईल. एक वर्षापूर्वी देखील असेच आश्वासन दिले होते. त्याची पूर्तताही झाली नाही. आज विवेक धुमाळ यांनी केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांची भेट घेतली त्यांना प्रतिकात्मक पाळणा भेट केला. हा पाळणा त्यांच्या टेबलवर राहणार तेव्हा त्यांना आठवण येईल की, प्रसूतीगृह सुरु करायचे आहे. त्यासाठी हा पाळणा दिला गेल्याचे धुमाळ यांनी सांगितले.