‘पक्ष सोडला तर बघून घेईन’; भाजपला गळती तर मनसेत इनकमिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:19 AM2022-02-22T10:19:51+5:302022-02-22T10:20:15+5:30
कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली असताना मनसेत इनकमिंग सुरू झाले आहे.
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली असताना मनसेत इनकमिंग सुरू झाले आहे. रविवारी डोंबिवलीत पार पडलेल्या पक्ष मेळाव्यात ३०० जणांनी मनसेत प्रवेश केला. भ्रमात राहू नका. अफवा पसरविल्या जातात. हा तो सोडून चालला. मात्र जो कोणी पक्ष सोडून जाईल, त्याला बघून घेणार असल्याचा सज्जड दमच मनसे आमदार राजू पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना यावेळी भरला.
डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यास मनसेचे पदाधिकारी प्रकाश भोईर, मनोज घरत, मंदा पाटील, राहुल कामत, हर्षद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मनसेत अनेक कार्यकर्ते येण्यास इच्छुक असताना राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात कोणताही कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश दोन वर्षे लांबला होता. आजच्या जाहीर मेळव्यात हा प्रवेश झाला. ही तर केवळ एक झाकी आहे. निवडणूक अजून बाकी असल्याचा सूचक इशारा पाटील यांनी यावेळी दिला. २००९ साली महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले. २०१४ साली मोदी लाटेचा फटका बसल्याने ९ नगरसेवक निवडून आले. आता पुन्हा मनसेचे नगरसेवक मोठ्या संख्यने निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मनसे सोडून गेलेले राजेश कदम यांचा नामोल्लेख न करता एक भोंगा वाजतो अशी टीका केली. पाकिटे घेऊन दुसऱ्या पक्षात हा भोंगा गेला. आता जो कोणी पक्ष सोडून जाईल त्यांना बघून घेणार असल्याचा दमच पाटील यांनी भरला.