शिवसेनेपाठोपाठ भाजपाचाही मनसेला मोठा धक्का; KDMC निवडणुकीत बसणार जोरदार फटका
By प्रविण मरगळे | Published: February 2, 2021 11:46 AM2021-02-02T11:46:26+5:302021-02-02T12:06:03+5:30
सोमवारी शिवसेनेने मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सागर जेधे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला होता
अनिकेत घमंडी
डोंबिवली – आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सोमवारी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेला मंगळवारी दुसरा धक्का बसला आहे. मनसेचे नगरसेवक मंदार हळबे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना-भाजपाने मनसेला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलं आहे. मनसेचे अनेक पदाधिकारी शिवसेना-भाजपाच्या वाटेवर असल्याचं समजतंय. मंदार हळबे हे आतापर्यंत २ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाची तिकीट हळबेंना देण्यात आली होती, तेव्हा ३७ हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला होता.
मंदार हळबे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते, सोमवारी शिवसेनेने मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सागर जेधे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला होता, त्यात मंगळवारी लगेचच मंदार हळबे यांचा भाजपा प्रवेश झाल्याने मनसेला डोंबिवलीत मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे. कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील, दीपक भोसले आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कदम हे पूर्वी शिवसेनेत होते. मनसेची स्थापना झाल्यापासून ते संस्थापक सदस्य होते. २००९ मध्ये त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. विविध कल्पक आंदोलने करून महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरणारे, अशी कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा सच्चा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षात घेऊन मनसेचाच मोहरा हिरावून घेतला आहे. आता शिवसेनेपाठोपाठ भाजपानेही मनसेला जबर धक्का दिला आहे. मंदार हळबे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम पाहायला मिळणार आहे.