"श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:20 PM2022-01-06T17:20:08+5:302022-01-06T17:20:31+5:30
२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे.
कल्याण-
२७ गावांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभ उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मायक्रो लेव्हलला जाऊना पाठपुरावा केल्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे. मात्र जागेचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी सोडविला असा त्यांचा दावा आहे. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्यात मनसे आमदारांची पीएचडी असल्याची टिका शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले की, योजना मंजूर झाल्यावर जलवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र जागेचा प्रश्न निर्माण झाला. योजनेसाठी उभारलेल्या जाणा:या जलकुंभासाठी जागा नव्हती. ही जागा सरकारी होती. या जागेच्या बदल्यात महापालिकेस ८० कोटी सरकारला द्यावे लागले असते. ही जागा नागरीकांच्या पाणी योजनेसाठी द्यावी लागणार असल्याने ही रक्कम माफ करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हाधिका:यांकडे केली होती. तसेच यासंदर्भात जिल्हाधिका:यांसोबत २० नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती.
जागा देण्याचा निर्णय त्याच बैठकीत तत्वत: मंजूर करण्यात आला होता. तसेच पैसे माफ करण्याचाही विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे मनसे आमदारांनी श्रेय घेण्याचे काम करु नये असा सल्ला म्हात्रे यांनी मनसे आमदारांना दिला आहे. यापूर्वीही मानपाडा रस्त्याच्या कामावरुन शिवसेना खासदार आणि मनसे आमदार यांच्यात कामाच्या मंजूरीवरुन राजकारण रंगले होते. आत्ता पुन्हा अमृत योजनेच्या कामावरुन राजकारण रंगले आहे.