रेरा फसवणूक प्रकरणात अधिकाऱ्यांना देखील दोषी धरा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
By मुरलीधर भवार | Published: November 12, 2022 05:54 PM2022-11-12T17:54:23+5:302022-11-12T17:54:59+5:30
या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आमदार राजू पाटील यांनी दिले होते.
कल्याण-कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत उघडकीस आलेला महारेरा सर्टिफिकेट घोटाळा आता चांगलाच चर्चेत आला आहे.यामध्ये उद्योजकांसह भूमालकांची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात बांधकामे झाली आहेत. त्यांना देखील दोषी ठरवून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली आहे. या संदर्भात राज्याचे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील आमदार राजू पाटील यांनी दिले होते.
राज्यातील पहिला महारेरा सर्टीफिकेट घोटाळा कल्याण डोंबिवलीत समोर आलाय. या घोटाळ्यात आता पर्यंत ६५ बिल्डरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर यांत ५ जणांना अटक झाली. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असं मत आता तपास यंत्रणांचे झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हा एसआयटी मार्फत सुरू आहे. मात्र हि बांधकामे एका दिवसात झालेली नाहीत. त्यामुळे ज्या बांधकामांना भू-मालक आणि बिल्डर जेवढे जबाबदार आहेत तेवढेच अधिकारी देखील आहेत.कारण एका दिवसात हि बांधकामी झालेली नाहीत. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दोषी ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती कडे केली आहे. या मागणीवर पालकमंत्री संभूराजे देसाई आणि खासदारा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अन्यही काही मागण्या
महापालिका क्षेत्रातील २७ गावातील ४९९ सफाई कामगार कामगारांना तातडीने शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे. मध्य रेल्वेच्या दिवा ते बदलापूर स्थानके फेरीवाला मुक्त करण्यात यावीत. कोणत्याही प्रकारची केडीएमसीची सुविधा न घेणाऱ्या पलावा सिटी मधील राहिवाश्यांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारणी महापालिका करत आहे.नागरिकांनी कर देखील भरलेला आहे.यामध्ये महापालिकेवर नागरिकांचे १५ कोटी पेक्षा अधिक पैसे जमा अधिकचे आहेत.त्यामुळे नागरिकांनी १५ कोटी रुपयांच्या अधिकच्या दिलेल्या पैशांची व्याजासहित पैसे मागतील त्यापेक्षा लवकरच निर्णय घ्या. २७ गावातील अमृत पाणी पुरवठा याेजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. या कामाला गती द्यावी यादेखील मागण्या आमदार पाटील यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"