'मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये'; राजू पाटील संतापले, ठाकरे सरकारला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:38 PM2021-04-03T15:38:24+5:302021-04-03T15:44:00+5:30
कल्याण डोंबिवलीमध्ये पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे.
कल्याण: कल्याणडोंबिवलीतील पूल अर्धवट असल्याने 1 एप्रिल रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकुर्ली उड्डाणपूलावर केक कापून अनोखे आंदोलन केले होते. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांचा पारा चांगलाच वाढला आहे. एकीकडे मनसेवर गुन्हे दाखल होतात मग कोपर पुलाचे गर्डर लॉचिंग व वडवली पुलाच्या उद्घाटनाला गर्दी करणा-यांवर कधी गुन्हे दाखल होणार? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ट्वीट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अर्धवट पुलांच्या निषेधार्थ मनसेने "एप्रिल फुल डब्बा गुल , कधी होणार कल्याण डोंबिवलीतील पूल " अशा घोषणा दिल्या होत्या. महापालिकेने आखून दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र यावर पाटील यांनी थेट आक्षेप घेत मनसेला कोणी गृहीत धरू नये, असा इशारा दिला आहे.
प्रशासनाने सत्ताधा-यांच्या हातातले बाहुले बनू नये तसेच पोलिसांनीही पक्षपातीपणा करू नये. पोलिसांबद्दल नेहमीच आदर आहे, असे देखील मत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आयुक्त आणि डीसीपी यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उद्घाटन झाले मग यावेळी गर्दी करणा-यांवर गुन्हा कधी दाखल होणार? असा प्रतिसवाल करत पाटील यांनी पालिका प्रशासन , पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून राहू नये. पेलिसांबद्दल नेहमीच आदर आहे परंतु त्यांनीही पक्षपातीपणा करू नये ही अपेक्षा आम्ही पण करतो.@AnilDeshmukhNCP@ThaneCityPolice@DGPMaharashtra@AjitPawarSpeaks
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 3, 2021
कल्याण डोंबिवलीमध्ये पुलांवरून आधीच राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. अर्धवट पुलांच्या कामाचा निषेध केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे पुलांचा वाद आणखीनच चिघळला आहे. दरम्यान मनसेने आंदोलन करताना सोशल डीस्टंसिंगचे पालन केले होते.तसेच आमच्याकडून पण तीव्र प्रतिक्रिया उमटतील असे पाटील यांनी "लोकमतशी" बोलताना सांगितले आहे. त्यामुळे येणा-या काळातही पुलांवरून आणखी राजकीय फटाके फूटतील यात काही शंका नाही.