पत्री पूल झाला, कोपर पूल कधी होणार? मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्याना सवाल; केलं असं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 03:25 PM2021-01-27T15:25:11+5:302021-01-27T15:25:28+5:30
कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण- कल्याणचा बहुचर्चित पत्री पूल झाला. पण, डोंबिवलीतील कोपर पूल कधी होणार? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. हेच ट्विट त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेलादेखील केले आहे.
कल्याणच्या बहुचर्चित पत्री पूलाचे काम पूर्ण झाले. या पूलाचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पाडला. पूल वाहतूकीसाठी सोमवारपासून खुला झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरीक व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. डोंबिवली शहरातील पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूलाचेही काम सध्या सुरू आहे. हा पूलदेखील डोंबिवली शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यातच आता, पत्री पूलाचे काम झाले. कोपर पूलाचे काम कधी होणार? असा सवाल मनसे आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नियोजनबद्ध काम, चांगली ठेकेदार कंपनी व सक्षम प्रशासन असले तर कामं काही दिवसात होऊ शकतात. #तिसाई_पुल (#पत्री_पुल) झाला, #कोपरपुल कधी होणार ? @KDMCOfficial@OfficeofUTpic.twitter.com/io4h5Sx41p
— Raju Patil (@rajupatilmanase) January 27, 2021
पत्री पूलाच्या कामासंदर्भात आमदार पाटील म्हणाले, नियोजनबद्ध काम, चांगला ठेकेदार आणि सक्षम प्रशासनामुळे पत्री पूलाचे काम झाले. मात्र कोपर पूलाचेही काम मार्गी लागले पाहिजे. कोपर पूलाच्या कामाच्या सद्यस्थितीचा फोटोही त्यांनी ट्विटला जोडला आहे. आमदार पाटील यांच्या या ट्विटवरून, पत्री पूलानंतर आता कोपर पूलाच्या कामावरून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य केले जाणार असल्याचे दिसत आहे.