...अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? मनसे आमदारांनी वेधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष
By प्रशांत माने | Published: May 5, 2023 07:07 PM2023-05-05T19:07:29+5:302023-05-05T19:07:46+5:30
राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही.
कल्याण: राज्य सरकारने केडीएमसीसाठी मंजूर केलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी पाणी कोटा अद्याप देण्यात आलेला नाही. परिणामी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील लक्ष दिले गेलेले नाही. त्याची झळ सोसावी लागत असून अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाआहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशात पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१ ऑगस्टपर्यंत पुरण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी ठाणे लघुपाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी मंगळवार पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान केडीएमसीसाठी मंजूर आणि आरक्षित असलेला हक्काचा पाणी पुरवठा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ही परिस्थिती ओढावू नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना पाणी टंचाईच्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधत फडणवीस यांना आज पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला आहे. कल्याण डोंबिवलीकरांनी अजून किती दिवस पाण्यासाठी वणवण करायची असा सवाल पाटील यांनी व्टीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.