नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 05:47 PM2024-02-24T17:47:50+5:302024-02-24T17:49:20+5:30

राज ठाकरेंनी आज कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज्य आणि देशातील राजकीय स्थितीवर रोखठोक भाष्य केलं आहे.

MNS President Raj Thackeray criticized Narendra Modi and BJP over the political situation in Maharashtra | नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

MNS Raj Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असताना मनसेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून विविध मतदारसंघांचा आढावा घेत कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरेंनी आज कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्य आणि देशातील राजकीय स्थितीवर त्यांनी रोखठोक भाष्य केलं आहे.

सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले की, "वरती केंद्रात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरू आहे ते चूकच आहे आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. आज अनेक तरुण-तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतोय? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात?" असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबद्दल संताप व्यक्त करत राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या जो विचका झाला आहे तसा मी या आधी कधीच पाहिला नव्हता. आता जनतेनेच यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे, अन्यथा यांना असंच वाटत राहणार की आमचं कोणीच वाकडं करणार नाही. आणि जनतेने वेळीच पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल," असं राज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेनेच्या कल्याण शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. याप्रकरणी राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, एखादा माणूस इतक्या थराला का जातो याचा विचार पण करावा लागेल. इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची स्थिती कोणी आणली, याची चौकशी व्हावी," अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :  

- एखाद्या व्यासपीठावर दोन पक्षांचे प्रतिनिधी एकत्र आले म्हणजे युत्या, आघाड्या झाल्या असं होत नसतं. माझे नेते आणि मी महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेत आहोत, तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहोत. जे काय सांगायचं ते योग्य वेळ आली की सांगेनच. 
 
- मी जे आधी बोलतो ते कालांतराने लोकांना पटतं. मी जे बोलतो ते कायम विचारपूर्वक बोलतो. मराठा आरक्षणाबद्दल मी आधीच बोललो होतो, तसंच मतदान पण ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर घ्या हे मीच आधी बोललो होतो. जगभरात सर्वत्र जर मतदान मतपत्रिकेवर होत असेल तर ते भारतात ईव्हीएमवर का हा माझा प्रश्न तेव्हाही होता आणि आज पण आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती की मतदान झाल्यावर तुम्हाला एक स्लिप येणार, त्याचं काय झालं ?

- महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची स्थिती भीषण आहे, अनेक भागांत दुष्काळ आहे, या सगळ्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्रात मराठी मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळत नसेल त्यांना नोकऱ्या मिळत नसतील आणि महाराष्ट्र इतकं समृद्ध राज्य असून जर असं होत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. 

- आपल्याकडचे महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकलेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत. महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं म्हणून ते बहुधा त्यांचं नावच घेत नव्हते आणि आता अचानक त्यांना महाराजांची आठवण येत आहे. 

- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा पण आज किती राजकारण्यांना मराठीचा अभिमान आहे, किती प्रेम आहे त्यांना भाषेबद्दल? अशी लोकं काय मराठी भाषेसाठी पाठपुरावा करणार आहेत. मी नेहमी सांगतो की राज्यात हे तिथलेच स्थानिक पक्ष हवेत. कारण त्यांना त्या राज्याविषयी, त्या राज्याच्या भाषेविषयी आस्था असते.

Web Title: MNS President Raj Thackeray criticized Narendra Modi and BJP over the political situation in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.