भिवंडीत खड्ड्यांविरोधात मनसेचे आंदोलन; रांगोळी काढून खड्डयांचे पूजन
By नितीन पंडित | Published: August 21, 2023 05:26 PM2023-08-21T17:26:45+5:302023-08-21T17:33:23+5:30
खड्ड्यांभोवती मनसे महिला सैनिकांनी रांगोळी काढून खड्ड्याचे पूजन केले आहे.
नितीन पंडित
भिवंडी : शहरात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सर्वत्रच जाणवत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खड्ड्यां विरोधात उग्र आंदोलन करण्याचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर मनसे कार्यकर्ते खड्डा विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.भिवंडी शहर व ग्रामीण भागात तीन ठिकाणी खड्ड्यां विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले.भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष मनोज गुळवी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी महानगरपालिका मुख्यालया समोर झालेल्या आंदोलनात पालिका प्रशासनाचा धिक्कार करीत स्वर्गीय आनंद दिघे चौक या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांभोवती मनसे महिला सैनिकांनी रांगोळी काढून खड्ड्याचे पूजन केले आहे.
या आंदोलनात महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा उर्मिला तांबे व मनसे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर आपले निवेदन पालिका आयुक्तांकडे सुपूर्द केले आहे. भिवंडी ग्रामीण कार्यकर्त्यांच्या वतीने अंजूर फाटा येथील कामण वसई रस्त्यावर मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे,जिल्हा समन्वयक मदन अण्णा पाटील,जिल्हा पदाधिकारी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शिवनाथ भगत,अँड.अरुण पाटील, संतोष म्हात्रे,दीपक पाटील,कुलेश तरे सहभागी झाले होते. मनसे तालुकाध्यक्ष विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली अंबाडी नाका येथे आंदोलन करीत रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला.