"ते" कधीही एकमेकांना डोळा मारतील - मनसे आमदार राजू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:21 PM2021-09-24T14:21:01+5:302021-09-24T14:21:36+5:30
शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपावर बोलताना ते कधीही एकमेकांना डोळा मारतील अस देखील पाटील म्हणाले.
मयुरी चव्हाण : लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: गेली इतकी वर्षे शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाऐवजी सुरू असणाऱ्य भावनिक खेळाच्या राजकारणाला लोकं कंटाळली असून आगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असेल असा ठाम विश्वास मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना भाजप मध्ये सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपावर बोलताना ते कधीही एकमेकांना डोळा मारतील अस देखील पाटील म्हणाले.
आगामी केडीएमसी निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन'तर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.शिवसेना - भाजपच्या विरोधावर आमचा विश्वास नाही.सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असणाऱ्या विरोधाच्या राजकारणावर आपला अजिबात विश्वास नाहीये. ते कधीही एकमेकांना डोळा मारतील त्यामूळे त्यांचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो ,असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटील यांनी विकासकामांसह दि.बा. पाटील नामकरण, केडीएमसी निवडणूक, शिवसेनेचे राजकारण, 27 गावे, पोलिसांची दडपशाही, सेना-भाजप विरोध, केडीएमसी आयुक्त आदी ठळक विषयांवर बेधडकपणे आपली मते व्यक्त केली.
सत्तेसाठी मनसेने लाचारी आणि नैतिकता सोडली नाही.मनसेने सत्तेसाठी कधीही शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही की नैतिकता सोडून आपले निर्णय बदलले नाहीत. सत्तेसाठी वेळ पडली असती तर त्यांनी एमआयएमशीही हातमिळवणी केली असती. आम्हाला राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार समजतात. त्यातून आपण एकच म्हणू शकतो की सत्तेसाठी त्यांनी एवढे खालची पायरी गाठायला नको होती असे सांगत शिवसेनेच्या महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापनेच्या निर्णयावर आमदार पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. आगामी निवडणुकीत सत्ताधा-यांनी जी आश्वासने दिली होती त्याबद्दल त्यांना जाब विचारणार. त्यांनी भावनिक मुद्दे दाखवले तर आम्ही रस्त्यावरचे खड्डे दाखवून जाब विचारणार आणि तेच सर्व मुद्दे लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, हर्षद पाटील, सुदेश चुडनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
दिबांच्या नावाला केलेल्या विरोधाचे परिणाम लवकरच दिसणार
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावं ही आमची मनापासूनची इच्छा आहे. मात्र कोणाचीही मागणी नसताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे करून विरोधी भूमिका घेतल्याने इथला आगरी समाज कमालीचा नाराज झाला आहे. आगरी समाजाचा हा राग त्या पक्षावर नसेल मात्र या व्यक्तीमुळे तो पक्षावर निघेल आणि येत्या काळात त्याचे परिणाम दिसतील असा सूचक इशाराही पाटील यांनी यावेळी शिवसेनेला दिला.