रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा
By मुरलीधर भवार | Published: July 26, 2023 06:05 PM2023-07-26T18:05:52+5:302023-07-26T18:06:21+5:30
महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकडे महापालिका लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला आघाडीच्या उर्मिला तांबे यांच्यासह मनसेचे गणेश चौधरी, कपील पवार, रोहन आक्केवार, गणेश लांडगे यांच्यासह मनसे कार्यकर्ते या मूक मोर्चात सहभागी झाले होते. तोंडावर काळ्या फिती लावून हातात महापालिकेच्या निषेधाचे फलक मनसे कार्यकर्त्यांनी घेतले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष भोईर यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर या पूढचा मोर्चा हा ठोक मोर्चा असेल. या ठोक मोर्चात मनसे काय करणार हे अधिकारी वर्गाला चांगले ठाऊक आहे.
महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. महापालिकेने १० प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी १३ कंत्राटदाराना काम दिले आहे. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहन चालक आणि प्रवाशांना प्रवास करताना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. तसेच कल्याण मलंग रोडवर एका तरुणाचा रस्त्यावरील खड्डा वाचविताना ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. महापालिका प्रशासनाकडून जबाबदार अभियंता आणि कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला जातो. प्रत्यक्षात जबाबदार कंत्राटदार आणि अभियंत्याच्या विरोधात अद्याप महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली गेलेली नाही. कारवाई शून्य आहे. तर खड्डेही भरले जात नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपये कंत्राटदार खड्डे न भरता खिशात भरणार असा आरोप मनसेच्या वतीने मूक मोर्चाच्या वेळी करण्यात आला आहे.