'वन नेशन वन इलेक्शनला मनसेचं समर्थन, पण..'; आ. पाटलांनी स्पष्टच सांगितलं
By मुरलीधर भवार | Published: September 2, 2023 09:09 PM2023-09-02T21:09:09+5:302023-09-02T21:10:15+5:30
पण त्या प्रामाणिक भावनेतून व्हायला पाहिजेत
ठाणे/कल्याण- आमच्या पक्षाचे आणि राज साहेबाचे नेहमीच म्हणणे असते. सततच्या निवडणूक असतात. आपल्याकडे निवडणूकांशिवाय दुसरा उद्योग काय आहे. सर्व निवडणूका एकत्र झाल्या एका अर्थाने ते चांगले पण आहे. परंतू त्या प्रामाणिक भावनेतून व्हायला पाहिजेत, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्व भागातील आडीवली येथील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रभागातील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन आज सायंकाळी आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक पाटील यांच्या मातोश्री शोभा पाटील या उपस्थित होत्या. यावेळी आमदार पाटील यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रभागाचे माजी नगरसेवक पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले होते. त्यांनी रस्त्याचे काम होण्यासाठी केलेला पाठपुरावा हा कौतूकास्पद आहे. या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार पाटील यांनी मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आहे. ते म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री स्वत: मराठा समाजाचे आहे.त्यामुळे मराठा आरक्षण विषय लवकरात लवकर मार्गी लावता येईल. त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे याकडे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
काही दिवसापूर्वी भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या रस्ते विकास कामाच्या वेळी त्यांच्या बॅनरवर आमदार पाटील यांचा फोटो झळकला होता. आज माजी नगरसेवक पाटील यांच्या कार्यक्रमात त्यांच्या फलकावर आमदार पाटील यांचा फोटा झळकला आहे. माजी नगरसेवक पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आहेत. आत्ता राष्ट्रवादीच्या बॅनरवर आमदार पाटील झळकल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.