परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप, कल्याणमध्ये घडली घटना
By मुरलीधर भवार | Published: October 2, 2023 04:46 PM2023-10-02T16:46:24+5:302023-10-02T16:46:45+5:30
आधी फेरीवाल्यांनी केली होती मराठी तरुणाला मारहाण
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका मराठी तरुणाला परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केली. हा प्रकार मराठी तरुणाने मनसे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला आहे. या घटनेमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय फेरीवाला हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
वासिंद येथे राहणारा एक मराठी तरुण कल्याणमध्ये काही कामासाठी आला होता. त्याने रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरील फेरीवाल्यांकडून एक वस्तू खरेदी केली. ती वस्तू चांगली निघाली नाही. त्यामुळे तो तरुण पुन्हा त्या फेरीवाल्याकडे आला. त्याने ती वस्तू फेरीवाल्यांना परत करीत पैसे परत मागितले. तेव्हा फेरीवाल्याने त्या तरुणाशी वाद घातला. वस्तू बदलून मिळणार नाही. तसेच पैसेही परत केले जाणार नाही. तुम्ही मराठी लाेक असेच असता अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधान केले.
त्यामुळे मराठी तरुणाचा स्वाभिमान दुखावला गेला. त्याचा फेरीवाल्यांसोबत वाद झाला. यावेळी फेरीवाल्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. तरुणाला मारहाण झाल्यावर त्या तरुणाने कल्याणमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्याच्यासोबत घडला प्रकार त्याने मनसे कार्यकर्त्यांकडे कथित केला. हा प्रकार ऐकून मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉक गाठले. मराठी तरुणाला मारहाण करुन मराठी विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना चांगलाच चोप दिला. ही घटना काल रात्री घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उफाळून आला आहे.
स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यात यावे यासाठी मनसेकडून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनासह रेल्वे प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. मात्र फेरीवाल्यांच्या विरोधात सरकारी यंत्रणांकडून काही एक कारवाई केली जात नसल्याने फेरीवाल्यांकडून मुजोरी सुरु आहे. हेच या घटनेतून उघड होत आहे.