कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी

By प्रशांत माने | Published: September 6, 2023 06:21 PM2023-09-06T18:21:03+5:302023-09-06T18:21:14+5:30

धुळीनेही कोंडला श्वास, जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची पुरती चाळण केली आहे. पावसाने उघडीप देताच खड्डे डांबराचे पॅचवर्क करून भरले जात आहेत.

Most of the roads in Kalyan-Dombivli towns are in potholes | कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी

कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी

googlenewsNext

कल्याण : बरेच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी आजही कल्याण-डोंबिवली शहरांतील बहुतांश रस्ते खड्ड्यांतच आहेत. खड्डे भरण्यासाठी डांबराचे पॅचवर्क केले जात असले, तरी ते काही दिवसांतच उखडले जात आहेत. डांबरातून खडी बाहेर पडून त्याचा त्रास वाहनचालकांना होत असताना त्या खडीचा वाहनांची ये-जा होऊन भुगा होत आहे. यात धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. आधीच बदलत्या हवामानात व्हायरल तापाची डोकेदुखी असताना धुळीमुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची पुरती चाळण केली आहे. पावसाने उघडीप देताच खड्डे डांबराचे पॅचवर्क करून भरले जात आहेत. दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला, तरी आजच्या घडीलाही दोन्ही शहरांमधील बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. वाहनांची ये-जा होऊन खड्ड्यांची खोली अधिक वाढली आहे. डांबराचे पॅचवर्क होऊनही अल्पावधीतच डांबरातून खडी बाहेर पडून ती इतरत्र सर्वत्र पसरली आहे. खड्ड्यांचा त्रास कायम असताना या खडीवरून दुचाकी घसरण्याचा धोका वाढला आहे. एकूणच केडीएमसीचे रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे, असे म्हणण्याची वेळ आली आहे..

धूळधाणीचा त्रास

डांबरातून खडी बाहेर पडून ती इतरत्र पसरली आहे. त्यात त्यावरून वाहनांची ये-जा होऊन त्या खडीची वाळूदेखील झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने ही वाळू वाहनांबरोबर हवेत उडून धुळीचा त्रास रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ही तर थूकपट्टीची कामे

डांबरी पॅचवर्कमुळे रस्ता समपातळीत राहत नाही. काही रस्त्यांवर मार्गक्रमण करताना या पॅचवर्कसह खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, जे पॅचवर्क केले जात आहे ते अल्पावधीतच उखडले जात असल्याने कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर डांबरीकरणाची थातूरमातूर थूकपट्टीची कामे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Web Title: Most of the roads in Kalyan-Dombivli towns are in potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.