ठाणे भिवंडी मार्गावरील माणकोलीत उभारली जाणार मदर लायब्ररी
By मुरलीधर भवार | Published: January 30, 2024 07:41 PM2024-01-30T19:41:30+5:302024-01-30T19:42:03+5:30
केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांची माहिती, या प्रत्येक ग्रामपंचायतीची ई लायब्ररी या मदर लायब्ररीशी जोडली जाईल. या मदर लायब्ररीत २ लाख पुस्तकांचे वाचन आ’नलाईन करता येण्याची सुविधा असेल
कल्याण-भिवंडी ठाणे मार्गावरील माणकोली गावात मदर लायब्ररी उभारली जाणार आहे. त्याकरीता केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाकडून राज्य सरकारच्या माध्यमातून २ कोटी रुपयांचा निधी ठाणे जिल्हा परिषदेस वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे लायब्ररी सुरु करण्याचे काम लवकर सुरु केले जाणार आहे. या लायब्ररीला आणखीन काही खर्च आल्यास त्यासाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची हमी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल इंडिया ही संकल्पना आहे. या संकल्पनेतून देशभरातील २ लाख ६० हजार ग्रामपंचायतीपैकी २ लाख ग्रामपंचायतींचा कारभार डिजिटल करण्यात आला आहे. या डिजिटल ग्रामपंचायती कुठलीही कामे, विकास प्रस्ताव आदीचे कामकाज आ’नलाईन पद्धतीने ई सिस्टीमच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लान, पंचायत समिती डेव्हलपमेंट प्लान आणि जिल्हा परिषदेचा डेव्हलपमेंट प्लान तयार करुन याठिकाणच्या नागरीकांच्या समस्या काय आहेत. त्या सोडविण्यावर सरकारचा भर आहे.
त्यासाठी पंचायत राज मंत्रालयाकडून त्याला प्रोत्साहन आणि निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. कर्नाटक राज्यात केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाकडून ५०० ग्रामपंचायती ई कारभार करीत आहेत. त्याठिकाणी मदर लायब्ररी विकसीत केले गेली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही ई लायब्ररी संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी ठाणे भिवंडी मार्गालगत असलेल्या माणकोली गावात मदर लायब्ररी उभी केली जाणार आहे. महाराष्ट्रात २८ हजार ग्रामपंचायती आहेत. या प्रत्येक ग्रामपंचायतीची ई लायब्ररी या मदर लायब्ररीशी जोडली जाईल. या मदर लायब्ररीत २ लाख पुस्तकांचे वाचन आ’नलाईन करता येण्याची सुविधा असेल. त्याचबरोबर आ’फलाईन पुस्तके वाचण्यासाठीची सुविधाही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते यूपीएससीची परिक्षा देणारे विद्यार्थी या लायब्ररीचा लाभ घेऊ शकतात असे मंत्री पाटील यांनी सांगितले.