मलंगगडमुक्तीवरुन एकनाथ शिंदेंच्या विधानावरुन ओवैसी आक्रमक; वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:57 PM2024-01-05T13:57:26+5:302024-01-05T13:58:18+5:30
मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मलंगगडमुक्तीच्या आंदोलनाचे आम्ही साक्षीदार असून श्री मलंगगडाबाबतची लोकभावना आमच्या लक्षात असून काही गोष्टी आपण जाहीरपणे सांगू शकत नाही. मात्र आपल्या सर्वांच्या मनात असणारी मलंगगडमुक्तीची भावना पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आयोजित राज्यस्तरीय श्री मलंगगड अखंड हरिनाम सप्ताह झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंधित सर्व सरकार मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ओवैसी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच अशा प्रकारचे वक्तव्य करून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणे कितपत योग्य आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उघडपणे लोकांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करत आहेत, असा आरोपही ओवैसी यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा वाद आता आणखी किती वाढतो, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नेमका वाद काय?
मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही धर्मांचे लोक या जागेवर दावा करतात. मलंगगडाच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे, हाजी मलंग दर्गा. जो बाराव्या शतकात मध्यपूर्वेतून भारतात आलेला एक सूफी संत बाबा अब्दुर रहमान मलंग यांना समर्पित आहे. हा दर्गा तब्बल ३०० वर्षे जुना आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, मलंगगड मौर्य वंशाचा राजा नालेदेव याने सातव्या शतकात बांधला होता. हा किल्ला टेकडीच्या तीन छोट्या भागांवर बांधला गेला आहे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या कल्याणमध्ये आहे. हिंदू समुदायाचा एक भाग याला मच्छिंद्रनाथ समाधी म्हणून ओळखतो. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. श्री मलंगगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. तर दुसरीकडे तेराव्या शतकात येमेनहून आलेले सूफी संत सूफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग ऊर्फ मलंग बाबा यांची ही कबर आहे. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक-एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.