कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाला गती द्या; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By मुरलीधर भवार | Published: August 18, 2022 01:28 PM2022-08-18T13:28:19+5:302022-08-18T13:30:42+5:30
कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुरलीधर भवार
कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कल्याण तळोजा हा मेट्रो रेल्वे मार्ग ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तारीत मार्ग आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण हे तळोजाला थेट जोडले जाईल. त्याचा फायदा शहरी भागासह ग्रामीण भागालाही होईल याकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.
कल्याण-डोंबिवली-तळोजा या मार्गाला मंजूरी देण्यात आलेली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गाची उभारणी केली जात आहे. प्रवास सुखकर आणि जलद व्हावा यासाठी हे मार्ग तयार केले जात आहेत. सध्या तळोजा ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या मार्गाला महत्व आहे. हा मार्ग जवळपा २१ किलोमीटर अंतराचा आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरु होऊन पुढे तो डोंबिवली, मानपाडा कल्याण ग्रामीणमधील विविध गावे जोडणारा ठरणार आहे. या मार्गावरील तळोजा हे अंतिम स्थानक राहणार आहे. या प्रकल्पाकरीता यापूर्वीच सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार समितीला तातडीने योग्य ते निर्देश द्यावेत. कामाला सुरुवात करण्यात यावी. या आशयाचे लेखी निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना खासदार शिंदे यांनी दिले आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो मार्ग पुढे कल्याण-डोंबिवली-तळोजा असा विस्तारीत होणार आहे. तळोजो ते नवी मुंबई हा मार्ग आहे. त्यामुळे मेट्रोने ठाण्याहून निघालेला प्रवासी थेट नवी मुंबईला जाऊ शकतो. तसेच नवी मुंबईहून निघालेला प्रवासी थेट ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी गाठू शकतो. भिवंडी-कल्याण हे रेल्वेने जोडले गेले नसल्याने आत्ता भिवंडी शहर थेट ठाणे आणि कल्याणसह तळोजा-नवी मुंबईशी जोडले जाणार आहे.