खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची घेतली भेट

By अनिकेत घमंडी | Published: June 5, 2023 08:06 PM2023-06-05T20:06:44+5:302023-06-05T20:07:05+5:30

कल्याण लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांसाठी भेट

MP Shrikant Shinde met the Divisional Managers of Central Railway | खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची घेतली भेट

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची घेतली भेट

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांतील प्रश्न, पायाभूत सुविधा, उपनगरीय रेल्वे गाड्यांनी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या यांसह कल्याण यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्पाला गती मिळावी यासाठी आज खासदार डॉक. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई येथील मध्य रेल्वेच्या कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकी दरम्यान रजनीश गोयल यांना या समस्या सोडविण्यासाठी उपायोजना राबविण्याच्या सूचना केल्या. कल्याण यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्पाचा आराखडा येत्या काही दिवसात तयार होणार असून त्यानुसार काम सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सुमारे ८०० कोटी रुपयांच्या निधीतून कल्याण यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना आणि या प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांबाबतच आढावा आजच्या बैठकीत घेतला.

  • या अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच ट्रॅक सेग्रीगेशन करण्यात येणार आहे.
  • सद्यस्थितीत कल्याण पूर्व स्थानक परिसरात थेट कोणतीही वाहने जाऊ शकत नाहीत. नागरिकांना काही मीटर अंतर चालत येऊन स्थानक गाठावे लागते. यामुळे वाहनांना स्थानकात येण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत चर्चा झाली. येत्या काही दिवसात त्याचा पूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात थेट वाहने घेऊन जाता येणार आहे.
  • दिवा स्थानकातून कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना आपण थांबा दिला आहे. येत्या कालावधीत अधिक गाड्यांना थांबा देण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी कमी असल्याने एक्स्प्रेस गाड्यांना थांबण्यास मोठी अडचण होते. यासाठी दिवा स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणाऱ्या फलाटाचे लांबी-रुंदीकरण करण्यात यावे. यासाठी लागणारी जमीन संपादित करून मोठया काम करावे लागणार आहे. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. 
  • ऐरोली - कळवा उन्नत मार्गिका प्रकल्प रखडला असून त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. तर यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या.
  • सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान डोंबिवली तसेच अंबरनाथ, बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्यात यावी.
  • ठाणे पुढील सर्व रेल्वे स्थानकातील शौचालयांची दुरवस्था थांबविण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप या तत्त्वावर ते चालविण्यासाठी देण्यात आले तर त्याची चांगल्या पद्धतीने देखभाल ठेवण्यात येईल. यामुळे नागरिकांना प्रामुख्याने महिलांना स्वच्छ शौचालये उपलब्ध होतील. 
  • अमृत भारत स्टेशनमध्ये दिवा, मुंब्रा, डोंबिवली या स्थानकांचा विकास केला जाणार असून उर्वरित स्थानकांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे 
  • पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचू नये यासाठी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक महापालिका यांच्या समन्वयाने नालेसफाई पूर्णत्वास न्यावी.
  • अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार आणि स्थानक परिसराला ' हेरिटेज लूक ' देण्यात यावा. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. 
  • मतदार संघातील सर्व स्थानकांमध्ये  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • रेतीबंदर आणि गणेशपाडा येथे भुयारी मार्ग
  • दिवा आणि वसई दरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे.

यांसह विविध विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यातील सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी  सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनीही सर्व विकासकामे वेगाने केली जातील असे आश्वास्त करत सकारात्मक प्रतिसाद दिला.

या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगर उपजिल्हा प्रमुख अरुण आशान, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, दिवा उपशहरप्रमुख व दिवा रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष अँड. आदेश भगत,  उपशहरप्रमुख प्रशांत काळे, डोंबिवली शहर सचिव आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, माजी नगरसेवक निलेश शिंदे, स्वाती मोहिते यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: MP Shrikant Shinde met the Divisional Managers of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.