शिवसेना-भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करु नये; श्रीकांत शिंदेंनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 09:52 PM2023-06-09T21:52:53+5:302023-06-09T21:55:02+5:30
मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपाने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. ती आढावा बैठक कल्याण पूर्व येथे तिसाई देवी हॉलमध्ये संपन्न झाली. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना वाटते तेवढी त्यांची लोकसभा निवडणूक सोपी नसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.
भाजपाच्या या भूमिकेवर आता स्वत: खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलं आहे. २०२४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करु, परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना आणि भाजपाच्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण कोणी करु नये. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना-भाजपा युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. केंद्रात पुन्हा भाजपा-शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असंही श्रीकांत शिंदेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.