एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी
By अनिकेत घमंडी | Published: January 16, 2024 03:15 PM2024-01-16T15:15:51+5:302024-01-16T15:16:06+5:30
एमआयडीसीच्या पाइपलाइन मधून येणारे पाणी गढूळ येत असल्याचे दिसत असल्याने काही रहिवाशांनी एमआयडीसीकडे फोन करून तक्रारी केल्याची माहिती त्रस्त रहिवासी राजू नलावडे यांनी दिली.
डोंबिवली:/ एमआयडीसी निवासी भागातील मॉडेल कॉलेज परिसरातील काही इमारतींचा नळाला आणि स्वर्गीय आनंद दिघे उद्यानातील नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीच्या पाइपलाइन मधून येणारे पाणी गढूळ येत असल्याचे दिसत असल्याने काही रहिवाशांनी एमआयडीसीकडे फोन करून तक्रारी केल्याची माहिती त्रस्त रहिवासी राजू नलावडे यांनी दिली.
ते म्हणाले।की, एमआयडीसी भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम चालू असताना अनेक ठिकाणी पाण्याच्या पाइपलाइन फुटण्याचा घटना घडत आहेत. काही वेळा जमिनीच्या अंतर्गत भागात पाइपलाइन फुटली असता ती समजून येत नाही. त्यामुळे त्याची दुरुस्ती होत नाही. त्यातून कदाचित माती आणि गटाराचे पाणी पाइपलाइन मधून शिरून गढूळ पाणी येण्याची शक्यता असते. शिवाय इतर अनेक कारणांमुळे गढूळ पाणी येत असते.
एमआयडीसी प्रशासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सद्या एमआयडीसी निवासी भागात अनेक आजारांनी लोक त्रस्त झाले आहेत. स्थानिक दवाखान्यात उपचार करून घेणाऱ्या लोकांची गर्दी झालेली दिसत आहे. त्याला अनेक कारणे आहेत. हल्ली रासायनिक प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. रस्त्यांचा काँक्रीटीकरण कामाच्या वेळी आजूबाजूला पडलेल्या राडारोडा, मातीचा ढिगारा, धुळी मुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत. एकंदर केडीएमसी, एमआयडीसी, एमएमआरडीए इत्यादी प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. सद्या राजकीय निवडणूक, आणि अयोध्याच्या धर्तीवर धार्मिक वातावरणामुळे महापालिका यंत्रणांच्या दृष्टीने असे महत्त्वाचे प्रश्न विसरून गेल्याची खन्त त्यांनी व्यक्त केली.