मुंबई भागात रेल्वे हेल्पलाइनवर दिवसाला येतात २५० कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:31 AM2021-02-10T01:31:33+5:302021-02-10T01:31:49+5:30

स्वच्छतेसाठी सर्वाधिक काॅल; कोविडमुळे कॅटरिंग बंद

In Mumbai area, 250 calls are received daily on the railway helpline | मुंबई भागात रेल्वे हेल्पलाइनवर दिवसाला येतात २५० कॉल

मुंबई भागात रेल्वे हेल्पलाइनवर दिवसाला येतात २५० कॉल

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर मुंबईच्या मुख्यालयात दिवसाला २५० कॉल येतात. त्यापैकी बहुतांश कॉल हे रेल्वे डब्यातील स्वच्छतेसह एसी सुरू नसल्याबाबत किंवा गारवा कमी असल्यासंदर्भात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, तसेच त्यांना प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत, त्यात महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिक, प्रवासातील गैरसोय तसेच प्रवासात सामान राहिले असल्यास साधारण फोन येणे अपेक्षित असते. मात्र त्या तुलनेत डब्यांमधील स्वच्छता, प्रसाधनगृहातील अस्वच्छता, पाणी नसणे अशा संदर्भात जास्त कॉल येतात. त्याखालोखाल वातानुकूलित डब्यातील एसी कार्यान्वित नसणे, असले तरी गारव्याची समस्या भेडसावणे, तसेच जनरल अथवा स्लीपरच्या डब्यातील पंखे, लाइट बंद असणे अशा समस्यांबाबतही कॉल येतात.  आरक्षित डब्यात विनाआरक्षित प्रवासी चढले आणि त्यांच्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होत असेल तर त्यासंदर्भातही कॉल येतात. बहुतांश वेळा रेल्वे डब्यात असणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या जवानांना प्रवासी सांगतात तेव्हा समस्या सुटण्याची शक्यता असते; पण जवान दिसले नाही तर प्रवासी थेट हेल्पलाइनवर माहिती देतात.  

फेक काॅल करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद
कोविड १९ सुरू झाल्यापासून रेल्वेने गाड्यांमधील पॅन्ट्री (खानपान सेवा) बंद केली असल्याने गेल्या ११ महिन्यांत त्यासंदर्भातील समस्येबाबत अथवा मागणीबाबत हेल्पलाइनवर कॉल येणे बंद झाले आहे. तरीही सेवा सुरू करावी, अशी मागणी करणारे कॉल कधी तरी येतात.
काही कॉल हे फेक असतात. एखाद्या प्रवाशाने थट्टा म्हणून चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्यावर लगेच कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या असतात. त्यात शिक्षेची तरतूददेखील आहे.

समस्या निराकरणास तत्काळ प्रतिसाद
महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल आले तरी त्याचे निराकरण करण्यासाठी आरपीएफ, रेल्वेच्या अन्य यंत्रणा धावपळ करतात. बहुतांश डब्यांमधून सातत्याने पोलीस गस्त सुरू असते, त्यामुळे सुरक्षेसंदर्भात तुलनेने फार कमी कॉल येतात. कोणत्याही प्रवाशाला वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन सेवा देण्याचा प्रयत्न करते. प्रवासात प्रसूती, हृदयविकाराबाबत तातडीने मदत केली जाते.

Web Title: In Mumbai area, 250 calls are received daily on the railway helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.