गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास

By अनिकेत घमंडी | Published: July 7, 2024 10:22 AM2024-07-07T10:22:56+5:302024-07-07T10:24:06+5:30

नाइलाजाने महिला प्रवाशांना करावा लागतोय द्वितीय श्रेणीतून प्रवास

Mumbai Why is there no new ladies special local train in last 14 years | गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास

गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास

डोंबिवली : मध्य, पश्चिम रेल्वेच्या महिला प्रवाशांची संख्या सुमारे आठ लाखांहून अधिक आहे; मात्र या प्रवाशांना रेल्वे प्रशासन सापत्न वागणूक देते. गेल्या १४ वर्षांत एकही लेडीज स्पेशल लोकल वाढवलेली नाही. मध्य रेल्वेवर सकाळी ८ च्या सुमारास एक कल्याण सीएसएमटी लोकल सोडली तर नवी लेडीज स्पेशल लोकल दिलेली नाही.

ज्या काही तुटपुंज्या लोकल फेऱ्या रेल्वेने वाढवल्या. सकाळी गर्दीच्या वेळेत बदलापूर, टिटवाळा येथून; तसेच डोंबिवली येथून महिला विशेष लोकल सोडण्याची मागणी वर्षानुवर्षे सुरू आहे; मात्र त्या मागणीचा विचार केला जात नाही, ही रेल्वेच्या महिला प्रवाशांची शोकांतिका आहे. राजकीय नेते रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठकीला हा मुद्दा घेतात; पण तो केवळ कागदावर राहत असल्याचा अनुभव महिला गेली १४ वर्षे घेत आहेत. महिला विशेष लोकल सोडल्यास सध्या ठिकठिकाणी स्थानकात महिलांची होणारी गर्दी विभागली जाईल.

नाइलाजाने द्वितीय श्रेणीतून प्रवास

पुरुषांना जेवढे डबे आहेत त्या तुलनेत महिलांना डबे कमी आहेत. १२ डब्यांच्या लोकलमध्ये द्वितीय श्रेणीचा पुढील, मागील आणि मधला डबा असे तीन डबे महिलांना राखीव आहेत. त्यात वाढ व्हावी, अशी महिलांची मागणी आहे. त्याचा विचार केला जात नाही, अशी खंत महिलांनी व्यक्त केली. फर्स्ट क्लासचा अर्धा डबा महिलांना राखीव आहे; मात्र त्यात अवघी १४ आसन क्षमता असते, महिला त्यावर ‘किचन’ अशी टीका करतात. बहुतांश महिला आरामदायी प्रवास मिळावा, या अपेक्षेने फर्स्ट क्लासचा महागडा पास काढतात; पण क्वचित बसायला मिळते, डब्यात प्रवेश मिळत नाहीत म्हणून नाइलाजाने द्वितीय श्रेणीतून प्रवास करतात. 

फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर रांग

मध्य, पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या सर्वच स्थानकांत महिलांना फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर रांग लावावी लागते. नंबर आला तर डब्यात प्रवेश मिळतो. त्यातून महिलांना होणारा त्रास रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही, याबद्दल महिला तीव्र नाराजी व्यक्त करतात. महिलांच्या डब्यात पुरुष फेरीवाला येऊ नये, अशी माफक अपेक्षा महिला करतात; परंतु प्रचंड गर्दीत फेरीवाला चढतो, त्याचा डब्यातील मुक्त वावर महिलांना अस्वस्थ करतो; परंतु त्यावर रेल्वे कठोर उपाय करीत नाही, त्यासाठी महिला विशेष लोकल वाढवण्याची मागणी महिला करीत आहेत.

Web Title: Mumbai Why is there no new ladies special local train in last 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.