समस्या सोडविण्याचं महापालिकेचे आश्वासन; उल्हासनगरात भाजपा नगरसेविकेच्या उपोषणाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 06:18 PM2020-11-23T18:18:18+5:302020-11-23T18:18:32+5:30
महापालिका मुख्यालय समोर लक्ष्मी सिंग यांनी उपोषण सुरू करताच, महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
उल्हासनगर : प्रभागारातील पाणी गळती, रस्त्याची दुरावस्था, शौचालय दुरुस्ती आदी समस्यांच्या निषेधार्थ भाजपा नगरसेविका लक्ष्मी सिंग यांनी महापालिका मुख्यालय समोर आज उपोषण सुरू केले. उपायुक्त मदन सोंडे यांच्या समक्ष बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी आश्वासन दिल्यानंतर नागरसेविकेंचे उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.
उल्हासनगर प्रभाग क्रं-७ मधून भाजपच्या लक्ष्मी सिंग, शुभांगी निकम, रिपाइंचे भगवान भालेराव, अपेक्षा भालेराव नगरसेवक पदी निवडून आले आहेत. यापैकी भगवान भालेराव उपमहापौर तर शुभांगी निकम प्रभाग समिती सभापती असूनही प्रभाग विविध समस्यानी त्रस्त आहेत. गेल्या आठवड्यात मनसेने प्रभागातील समस्याच्या निषेधार्थ आंदोलन केले होते. पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून रस्त्याची दुरावस्था झाली. तसेच शौचालयाची दुरुस्ती व पुनर्बांधणी रखडली. यानिषेधार्थ भाजपच्या नगरसेविका लक्ष्मी सिंग आक्रमक होऊन त्यांनी महापालिकेला उपोषणाचा इशारा दिला. सोमवारी सकाळी ११ वाजता आमदार कुमार आयलानी, भाजपाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींच्या उपस्थित लक्ष्मी सिंग यांनी महापालिका मुख्यालय समोर उपोषण सुरू केले.
महापालिका मुख्यालय समोर लक्ष्मी सिंग यांनी उपोषण सुरू करताच, महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. उपायुक्त मदन सोंडे यांनी पाणी पुरवठा व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सी जे सोनावणे, महेश शितलानी यांच्या सोबत संबंधित अधिकाऱ्यांसह उपोषणकार्या लक्ष्मी सिंग यांची भेट घेऊन पाणी गळतीचे काम सुरू झाल्याचे सांगितले. तसेच शौचालय पुनर्बांधणीची निविदा काढल्याचे सांगून इतर शौचालयाची दुरुस्ती व रस्त्याच्या बांधणीचे लेखी आश्वासन दिले. नगरसेविका लक्ष्मी सिंग यांचे आश्वासन नंतर समाधान झाल्याने उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींनी शिवसेना आघाडीच्या अंतर्गत वादामुळे शहर समस्यांच्या विळख्यात सापडल्याची टीका केली. तर समस्यांचे निराकरण न झाल्यास पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसण्याचे संकेत नगरसेविका लक्ष्मी सिंग यांनी दिली.
विकासकामाला येणार गती - उपायुक्त सोंडे
महापालिका बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलानी व सी जे सोनावणे यांनी रस्ते व शौचालय दुरुस्ती व पाणी गळतीचे आश्वासन दिले. तर एका आठवड्यात प्रभागात विकास कामाला गती येणार असल्याची प्रतिक्रिया उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.