अर्धा एकर जमिनीसाठी चुलत भावाचा खून, आरोपीला पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 09:25 AM2021-11-20T09:25:02+5:302021-11-20T09:25:28+5:30
झारखंडमधून एकाला केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गावातील २० गुंठे जमिनीच्या वादातून दोघा भावांनी चुलत भावाची दगडाने प्रहार करून, खून केल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पुरण सिकंदर महतो (वय ४७) असे मृत भावाचे नाव आहे, तर खून करणाऱ्या दोघांपैकी कालुकुमार सीताराम महतो याला झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, त्याचा भाऊ लालुकुमार सीताराम महतो हा फरार आहे.
कालुकुमारला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले, हल्लाही झाला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस आरोपीला ताब्यात घेत डोंबिवलीत घेऊन आले. मूळचे झारखंड येथील रहिवासी असलेले पुरण हे मजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात वास्तव्याला होते, तर त्यांचे चुलत भाऊ कालुकुमार आणि लालुकुमार हे दोघेही गोळवलीत इतर ठिकाणी राहात होते. पुरणचा त्याच्या चुलत भावांशी जमिनीवरून वाद होता. या वादातून झारखंडमध्ये त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, पुरणचा काटा काढून हा वाद कायमचा संपवायचा असा डाव भावांनी आखला.
कालुकुमार आणि लालुकुमार यांनी ४ नोव्हेंबरला रात्री पुरणला घरी जेवायला बोलावले. त्याला दारू पाजली. यावेळी जमिनीचा विषय उकरून काढत भांडण केले आणि मारहाण केली. डोक्यात दगड घातल्याने पुरण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हल्ला करून दोघेही पळून गेले. बेशुद्ध अवस्थेत पुरण हा आढळला. याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी पुरणला सायन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पुरणचा ८ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला.
सोमवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
गोळवलीत पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्या चुलत भावांची आणि जमिनीच्या वादाची माहिती मिळाली, तसेच ते झारखंड येथील मूळ गावी गेल्याची माहिती मिळताच, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक झारखंडला रवाना झाले आणि त्यांनी कालुकुमारला बेड्या ठोकल्या. त्याला सोमवार, २२ नोव्हेंबरपर्यंत कल्याण सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.