खून केला पुण्यात, दोघांच्या हातात कल्याण येथे पडल्या बेड्या; २० मिनिटांतच ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 09:00 AM2024-09-19T09:00:24+5:302024-09-19T09:01:14+5:30
राजूकुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी प्रवीण महतो याची हत्या केली.
कल्याण : पुण्यातील हिंजवडी परिसरात नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची हत्या करणारे दोघे जण बिहारला पळून जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. याबाबत पुणे पोलिसांनी मानपाडा पोलिसांशी संपर्क साधला. अवघ्या २० मिनिटांतच दोघांना कल्याण स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. राजूकुमार सिंग आणि धीरजकुमार सिंग अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी प्रवीण महतो याची हत्या केली.
बिहारला जाण्याचा प्रयत्न
तपासात प्रवीणचे दोन्ही मारेकरी कल्याणच्या दिशेने गेले आहेत. ते बुधवारी रेल्वेने बिहारला जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे विजय कादबाने यांना या घटनेची माहिती दिली.
मेडिकल स्टोअरमध्ये दिसले
कादबाने यांनी पोलिस निरीक्षक राम चोपडे, प्रशांत आंधळे यांचे पथक नेमले. पथक बुधवारी पहाटे कल्याण स्थानकावर पोहोचले. मारेकऱ्यांचा शाेध घेताना दोन संशयित मेडिकल स्टोअरमध्ये दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांनाही पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रवीणचे अनैतिक संबंध
प्रवीणचे बिहार येथे राहणारा शिक्षक राजूकुमार याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून राजू हा धीरजकुमार याला भेटला.
धीरज हा काही महिन्यांपूर्वी प्रवीण काम करीत असलेल्या नर्सरीतच कामाला होता.
धीरजने राजूकुमार याला बिहारहून बोलावून घेतले. त्या दोघांनी मिळून प्रवीणचा काटा काढला.