खूप काळ टिकण्यासाठी वाचन आवश्यकच : संकर्षण कऱ्हाडे
By अनिकेत घमंडी | Published: October 14, 2023 04:26 PM2023-10-14T16:26:33+5:302023-10-14T16:26:44+5:30
अखंड वाचन यज्ञाचे बिगुल वाजले
कल्याण : "वाचन आपल्या आयुष्यात फार महत्वाचे आहे , ते चटकन व्हायरल होणाऱ्या आणि पटकन विस्मरणात जाणाऱ्या गोष्टींसारखे नाही. वाचन कायम आपल्या मनात आणि डोक्यात रहाते आणि शेवटपर्यंत आपली सोबत करते " असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेते आणि कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी अखंड वाचनयज्ञच्या उद्घाटन प्रसंगी केले.
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आणि बालक मंदिर संस्था कल्याण व सार्वजनिक वाचनालय कल्याण यांचे सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या सलग ३६ तास आणि एकत्रित १०० तास अखंड वाचनयज्ञ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत अनेक उदाहरणे आणि किस्से सांगत मुलांना हसवत वाचनाचे महत्व समजावून दिले. प्रत्येक क्षेत्रात मोठी झालेली माणसे वाचनामुळे कशी घडली हे सांगून त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजात कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
"वाचनाशी नाळ जुळणे महत्वाचे असते , एकदा का नाळ जुळली की ती आपल्याला यश देते. वाचन हे एका दिवसापुरते न राहता ते सातत्याने केले पाहिजे " असे प्रतिपादन कोमसाप केंद्रीय अध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी केले. यशोदा या साने गुरुजी यांच्या आईच्या जीवनावरील मालिकेतील बालकलाकार वरदा देवधर हिने आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की , " वाचनामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे मी अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टींची सांगड घालू शकले."
या प्रसंगी डॉ योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या वाचनरंग या वाचन विषयक मान्यवरांच्या मुलाखती व लेख असलेले पुस्तक मान्यवरांचे प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय कल्याण चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी , बालक मंदिर संस्था कार्याध्यक्ष मयुरेश गद्रे यांची समयोचीत भाषणे झाली.
बालक मंदिर येथे आचार्य प्रल्हाद केशव नगरीमध्ये ना. धो. महानोर आणि साने गुरुजी वाचन कट्टा येथे आयोजित या उपक्रमात उद्घाटन झाल्यानंतर १५ शाळांतील १२५० विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरून अभिवाचन केले तर ६५०० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घेतला. रविवार १५ ऑक्टोबर रात्री ८ वाजेपर्यंत हे वाचन सुरू राहणार असून त्यामध्ये १२०० हून अधिक वाचक आणि १५००० हून अधिक रसिक सहभागी होतील असा विश्वास अक्षरमंचचे सचिव हेमंत नेहते यांनी व्यक्त केला. सदर उपक्रमास भिकू बारस्कर , तेजस्विनी पाठक , भालचंद्र घाटे, उत्तम गायकवाड , आरती मुळे , आरती कुलकर्णी , डॉ सुनील खर्डीकर, गीता जोशी , मच्छिंद्र कांबळे , शैलेश रेगे, गजेंद्र दीक्षित , पुंडलिक पै, अरविंद शिंदे यांचे सहकार्य लाभले आहे.