माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा! डोंबिवलीतील जाधव कुटुंबियांची अनोखी संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 04:06 PM2021-09-13T16:06:30+5:302021-09-13T16:10:25+5:30
Dombivali News : निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डोंबिवलीतील लोढा हेवन येथे माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा ही अनोखी संकल्पना बाप्पाच्या देखाव्यातून मांडली आहे.
मयुरी चव्हाण
सृष्टीत सर्वत्र ईश्वराने मुक्तहस्ताने आपल्याला दान दिले आहे. जसे की नद्या, झाडे, तलाव, हवा, निसर्ग, पक्षी, फुले आणि ही यादी न संपणारी आहे. मनुष्याने सुरुवातीला हवा तसा त्याचा उपभोग घेऊन कालांतराने त्याच पर्यावरणाचे व निसर्गाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. परिणामी पूर, भुस्खलन, दुष्काळ सोबत विविध आजार आले ते वेगळंच! अपरिमित वृक्षतोड, नद्या - समुद्र बुजविणे तसेच डोंगर तोंडून रस्ते बनविणे, नैसर्गिक स्रोत बंद करणे हे सर्व केले आणि त्याचाच परिणाम बदलते ऋतू चक्र,दुष्काळ, महापूर, भुस्खलन आणि महाड, उत्तराखंड, कोल्हापूर या ठिकाणी झालेला निसर्गाचा कोप. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी डोंबिवलीतील लोढा हेवन येथे माझी वसुंधरा, माझा निसर्ग, माझा बाप्पा ही अनोखी संकल्पना बाप्पाच्या देखाव्यातून मांडली आहे.
जाधव कुटुंबीयांनी लाडक्या बाप्पाची मूर्ती घरच्या घरी मातीने बनविली आहे. बाप्पा स्वतःच्या सोंडेने झाडाला पाणी घालत आहेत असं या देखाव्यातून मांडण्यात आलं असून "वृक्ष जोपासना करावी" असा संदेश देखील देण्यात आला आहे. गवत, लाजाळू, कडीपत्ता, सिलिजेनिया या झाडांचा वापर केला असून सोबत घरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी करणारे झाड (स्पायडर) देखील वापरले आहे. सजावटीमध्ये कार्डपेपर,मातीची पणती, मातीचे पक्षी, मातीचे दिवे, नैवैद्यासाठी मातीची ताट-वाटी, प्रसादासाठी मातीची भांडी तसेच सुकलेल्या वडाच्या झाडाच्या पारंब्या हे पर्यावरण पूरक सामान व बाप्पाची मूर्ती ही मातीची, रंग पाण्याचे व मातीचे आणि सभोवतालची सजावटही जी ईको फ्रेंडली व पर्यावरणपूरक असल्याचे दिसून येते रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी तुळस देखील सजावटीत वापरली असून झाडे लावा, जंगल टिकवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देताना बाप्पा विराजमान झाले आहेत.
पावसाचे पाणी डोंगराहून येत असताना माती धरून ठेवण्यासाठी जी झाडे किंवा जी क्षमता लागते ती अनेक ठिकाणी नव्हती म्हणून या ठिकाणी सर्व गावात भुस्खलन होऊन ती डोंगराखाली गाडली गेली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. त्यामुळे झाडांचं महत्व खूप आहे तसेच सोबत कोरोनाच्या प्रत्येक लाटेत जनतेला देखील ऑक्सिजनचीच गरज लागलेली हे देखील सर्वांनांच माहीत आहे म्हणूनच आता आपल्या आसपासच्या पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
- प्रशांत जाधव , डोंबिवली, लोढा हेवन.