नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक’ नाव द्या: विनय सहस्रबुद्धे
By अनिकेत घमंडी | Published: February 27, 2024 04:42 PM2024-02-27T16:42:51+5:302024-02-27T16:43:03+5:30
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची ठाणे रेल्वे स्थानकात बैठक
डोंबिवली : ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीनकाळातील मूळ नाव ‘श्रीस्थानक’ हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केल्या.
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी मंगळवारी ठाणे स्थानकाला भेट देऊन प्रवाशी सोयी-सुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांवर लक्ष वेधले. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे वसई या लोकल सेवा सुरु कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त बिना आरक्षित डबा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल-एक्सप्रेस गाड्यांना जाता-येता ठाणे येथे थांबा द्यावा, तसेच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वछतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमती देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्ट-मंडळाने केल्या.