राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’; पद न मिळाल्यानं नेत्यांमध्ये उघड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 02:16 AM2021-03-24T02:16:26+5:302021-03-24T02:16:44+5:30
जिल्हाध्यक्षपदी शिंदे आणि कार्याध्यक्षपदी पाटील यांची नोव्हेंबरमध्ये नियुक्ती झाली. परंतु, त्यानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही नव्या कार्यकारिणीला मुहूर्त मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हा कार्यकारिणीला अखेर मंगळवारी मुहूर्त मिळाला. जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे आणि कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी २५, तर सरचिटणीसपदी १३ जणांची नियुक्ती केल्याने ही जम्बो कार्यकारिणी चर्चेचा विषय ठरली आहे. या पदांच्या खैरातीत सावळागोंधळ सुरू असल्याचे चव्हाट्यावर आल्याने काहींनी स्थानिक पातळीवर काम न करता प्रदेश पातळीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. यात डोंबिवली विधानसभा क्षेत्रात अध्यक्षपद न मिळाल्याने नाराजीही समोर आल्याचे पद नियुक्तीपत्रक वाटपाच्या वेळी दिसून आले.
जिल्हाध्यक्षपदी शिंदे आणि कार्याध्यक्षपदी पाटील यांची नोव्हेंबरमध्ये नियुक्ती झाली. परंतु, त्यानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही नव्या कार्यकारिणीला मुहूर्त मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीच हालचाल होत नसल्याने ४ मार्चच्या ‘लोकमत’मध्ये ‘निवडणुकीला सामोरे जायचे तरी कसे?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. अखेर मंगळवारी ही कार्यकारिणी जाहीर केली गेली.
नवीन कार्यकारिणीत २५ जणांना उपाध्यक्षपद देण्यात आले. यातील प्रकाश तरे आणि नोवेल साळवे यांनी प्रदेश पातळीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने आणि प्रदेश कार्यालयाकडून त्यांना लवकरच नियुक्ती पत्रक मिळणार असल्याने त्यांनी जिल्हा उपाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्रक स्वीकारले नाही. तर राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भर दिला असून, सरचिटणीसपदी नेमलेल्या समीर गुधाटे यांच्याकडे याची विशेष जबाबदारी दिली आहे. सचिव पदावर नियुक्त केलेल्या तिघांमध्ये एकनाथ खडसे समर्थक प्रशांत माळी यांचा समावेश आहे. तर, चारही विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी नियुक्ती करताना कल्याण पश्चिमची जबाबदारी संदीप देसाई, कल्याण पूर्व अर्जुन नायर, कल्याण ग्रामीण दत्ता वझे, डोंबिवलीत सुरेश जोशी यांची अध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
भाऊ पाटील नाराज
डोंबिवलीतील सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी राहिलेल्या भाऊ पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. परंतु, अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या पाटील यांना ते पद न मिळाल्याने ते नाराज झाले. पद वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहूनही त्यांनी कार्याध्यक्षपद नियुक्ती पत्रक स्वीकारण्यास उघडपणे नकार दिला. अध्यक्षपद देण्यात येईल, असा शब्द स्थानिक नेत्यांनी आपल्याला दिला होता. परंतु, तो न पाळल्यामुळे नाराज असल्याची माहिती पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
‘...पण प्रसंगात पाठीशी राहा’
कार्यकर्ता पक्षवाढीसाठी मेहनत करतो. त्याला पैसा नको. परंतु, वेळप्रसंगी पाठीशी उभे राहा, ही भावना त्याची असते. याआधी अनेकांनी पक्षात मोठी मोठी पदे उपभोगली. परंतु, कालांतराने अन्य पक्षांची वाट धरली. आता पुन्हा त्यांची पावले राष्ट्रवादीकडे वळत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अशांना अटकाव करा, असे आवाहन डोंबिवली कार्याध्यक्षपदी निवड झालेले नंदू मालवणकर यांनी उपस्थित नेत्यांना केले.