Nawab Malik: नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी डोंबिवलीत भाजपची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:36 PM2022-02-24T12:36:37+5:302022-02-24T12:36:58+5:30
नवाब मालिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे.
डोंबिवली - राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. त्यानंतर आता मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी डोंबिवलीत भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात झालेल्या या निदर्शनांमध्ये नवाब मलिक आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना काल अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचे आणि राज्य सरकार पाडण्याच्या उद्देशाने झाल्याचे सांगत राष्ट्रवादीतर्फे बुधवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. त्याचा निषेध करण्यासह नवाब मालिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे. नवाब मलिक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता, दाऊदशी हितसंबंध, आर्थिक हितसंबंध अशा सर्व गोष्टी तपासल्यावरच ईडीने मलिक यांना अटक केल्याची माहिती भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर नवाब मलिक यांनी लवकरात लवकर राजीनामा देण्याची आग्रही मागणी भाजपतर्फे निदर्शनांदरम्यान करण्यात आली.
यावेळी झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक विशु पेडणेकर, निलेश शिंदे, समीर चिटणीस, भाजप युवा मोर्चाचे मितेश पेणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.