सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही; जयंत पाटील म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:17 PM2021-10-25T20:17:06+5:302021-10-25T20:18:29+5:30
आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल, असे विधान जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.
कल्याण-आम्ही एका सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये राहायचे आणि वेगळे वागायचे, असे आम्ही करणार नाही. आमचे दोन मित्र पक्ष आणि इतर मित्र पक्ष जिथे सोबत असतील त्याठिकाणी आमची आघाडी असेल असे विधान जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले. कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा गेल्या दोन दिवसापासून संवाद दौरा सुरु आहे. आज कल्याणमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते आले होते.
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार घातला. यावेळी त्यांचे फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मंत्री पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रकरणी मंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, मागच्या काळात कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गाजला होता. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रचंड मोठे दुर्लक्ष तत्कालीन सरकारने केले होते. आमच्या सरकारने खड्डे बुजविण्यास प्राधान्य दिले आहे.
कलानीसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही..
उल्हासनगरात कार्यकर्त्यांची बैठक संपल्यावर माजी आमदार पप्पू कलानी यांनी चहा करीता मला बोलवले होते. त्याठिकाणी चहापानासाठी मी गेलो होते. मात्र कलानी यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचा खुलासा मंत्री व प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केला आहे.
शिवाजी चौकात वाहतूक कोंडी -
मंत्री व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या स्वागतासाठी शिवाजी चौकात कार्यकत्र्यानी एकच गर्दी केली होती. यावेळी फटाके फोडण्यात आले. त्यामुळे काही वेळ शिवाजी चौकात वाहतूक कोंडी झाली होती.