चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी
By मुरलीधर भवार | Published: November 12, 2022 07:00 PM2022-11-12T19:00:48+5:302022-11-12T19:01:29+5:30
कल्याणच्या पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
कल्याण: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला. म्हणून ते आम्हाला सोडून तिकडे गेले असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी बावनकुळे यांच्या विरोधात कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत असे विधान केले होते की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरेयांच्यावर जादूटोणा केला. म्हणून ते महाविकास आघाडी सरकारमध्ये सामिल झाले. बावनकुळे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी बानकुळे यांच्या विरोधात तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तपासे यांचे म्हणणे आहे, २०१३ साली आघाडी सरकार असताना जादू टोणा विरोधी कायदा पारित झाला. या कायद्याच्या मंजूरीकरीता भाजपच्या दोन नेत्यांनी समर्थन दिले होते. आत्ता बावनकुळे यांनी जे विधान केले आहे ते पूर्णत: चूकीचे आहे. बावनकुळे यांच्याकडून जादूटोण्याचा प्रचार प्रसार केला जात आहे. ही गंभीर बाब आहे.