"मोबाईलपासून मुलांना दूर कसे ठेवता येईल याचा अभ्यासक्रम बनवण्याची गरज"
By मुरलीधर भवार | Published: December 21, 2023 03:55 PM2023-12-21T15:55:39+5:302023-12-21T15:55:58+5:30
कल्याणातील बिर्ला ओपन माईंड प्री स्कूलच्या शाखेचे उद्घाटन.
कल्याण : लहान मुलांचे मोबाईल वेड इतके भयंकर वाढले आहे की त्यांना मोबाईलपासून लांब कसे ठेवता येईल याचा अभ्यासक्रम बनवण्याची गरज सुप्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये यांनी व्यक्त केली. कल्याणातील बिर्ला ओपन माईंड प्री स्कूलच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन लिमये यांच्या हस्ते आज करण्यात आले. कल्याणातील शशिकांत चौधरी आणि त्यांच्या पत्नी जयश्री चौधरी यांच्या पुढाकाराने कल्याणातील गोदरेज हिल, खडकपाडा येथे ही शाळा सुरू झाली आहे.
हल्ली बोलताना किंवा काम करताना मुलांचा त्रास नको म्हणून पालक सर्रासपणे लहान मुलांना मोबाईल फोन देतात. मात्र त्यामूळे मुलांमधील मोबाईल वापराचे वेड ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे यावर एक अभ्यासक्रम बनवण्याची गरज असून तो समाजाला मदतशीर ठरेल असे यावेळी लिमये म्हणाले.
तर लहान मुलांमधील लठ्ठ्पणाची समस्या सोडवण्यासाठी शाळांमधूनच लष्कराच्या धर्तीवर शारीरिक प्रशिक्षण दिले पाहिजे असे सांगत या शाळेतून नक्कीच भविष्यातील चांगले नागरिक तयार होतील असा विश्वास आयएमए कल्याणचे माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
बिर्ला ओपन माईंड प्री स्कूलची ही कल्याणातील पहिली तर देशातील १७० वी शाखा आहे. लहान मुलांच्या गरजा ओळखूनच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अभ्यासक्रमाची आम्ही आखणी केल्याची माहिती यावेळी बिर्ला ओपन माईंड शाळा व्यवस्थापन समितीने दिली आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका रजनी मिरकुटे, महावितरणचे निवृत्त अधिकारी सुनिल चौधरी, कल्याण जनता बँकेचे व्यवस्थापक सुनिल भोईर, डॉ. सोनाली पाटील यांच्यासह प्रीती आंबेकर, मुकेश मिश्रा, गौरव दधीच, रवी शिवदासानी आदी मान्यवर उपस्थित होते.