दागिन्यांची हौस आली अंगलट! घरमालकिणीचे घर केले साफ, मोलकरीण गजाआड
By प्रशांत माने | Published: August 17, 2023 05:10 PM2023-08-17T17:10:52+5:302023-08-17T17:12:56+5:30
नेहा ढोलम असे अटक आरोपी महिलेचे नाव असून तिच्याकडून २ लाख ५५ हजाराचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
डोंबिवली: दागिन्यांची हौस एका मोलकरणीच्या चांगलीच अंगलट आली आहे. ज्या घरात पुर्वी काम करायची त्याच बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून तेथील सोनेचांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणा-या मोलकरणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. सीमा उर्फ नेहा ढोलम ( वय ४१) असे अटक आरोपी महिलेचे नाव असून तिच्याकडून २ लाख ५५ हजाराचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पूर्वेतील राजाजी पथ परिसरातील मैत्री नभानगणं इमारतीत ७० वर्षीय छाया प्रकाश साळवी या पतीसमवेत राहतात. साळवी पती-पत्नी शनिवारी सकाळी ११.३० वाजता मानपाडा चार रस्ता याठिकाणी खरेदीसाठी गेले होते. तेथून ते दुपारी सव्वाएकच्या सुमारास घरी परतले. तेव्हा त्यांना घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास पडले. घराचे कुलुप सुव्यवस्थित होते पण तरीही घरातील दागिने आणि रोकड गायब असल्याने त्यांनी याची माहीती रामनगर पोलिसांना दिली.
बनावट चावीच्या सहाय्याने ही चोरी झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करीत या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरक्षक योगेश सानप,पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, कुरणे, देविदास पोटे, नितीन सांगळे, दिलीप कोती, महिला पोलिस हवालदार प्रभा जाधव, महिला पोलिस शिपाई श्वेता राजपूत आदिंचे पथक नेमण्यात आले होते. पथकाने संबंधित इमारतीचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता साळवी यांच्याकडे पुर्वी काम घरकाम करणारी महिला सीमा ही चोरी झालेल्या कालावधीत इमारतीच्या लिफ्टमधून बाहेर पडताना दिसून आली.
सीमा ही २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत साळवी यांच्याकडे घरकाम करायची. वाद झाल्याने सीमाने तेथील काम सोडले होते. परंतू घरकाम करताना तिने साळवी यांच्या घराची डुप्लीकेट चावी बनवली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये तीचा चेहरा दिसताच पोलिसांनी तीला चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यावेळी तीने साळवी यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. तीचे पती गावी आजारी आहेत. तसेच तिला दागिन्यांची हौस हाेती. त्यामुळे तीने चोरी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.