नेहरूंच्या पुतळ्याची अखेर दिशा बदलली; आता प्रतीक्षा पुतळ्याच्या अनावरणाची
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 07:43 AM2023-12-22T07:43:05+5:302023-12-22T07:43:16+5:30
१९७६ च्या दरम्यान अंबरनाथच्या नेहरू उद्यानात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्यात आला होता.
- पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : गेल्या ४५ वर्षांपासून अंबरनाथच्या नेहरू उद्यानात उभा असलेला पुतळा अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. आता या पुतळ्याची दिशा बदलण्यात आली असून, लवकरच या पुतळ्याचे अनावरणही केले जाणार आहे. ‘लोकमत’ने ६ डिसेंबरच्या अंकात या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते.
१९७६ च्या दरम्यान अंबरनाथच्या नेहरू उद्यानात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण होण्याआधीच तेव्हा पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाल्याने या पुतळ्याचे अनावरण रखडले. त्यानंतरही वेळोवेळी अनावरण पुढे ढकलले गेले.
हा पुतळा आहे त्याच स्थितीतच उभा होता. आता नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून, पुतळ्याची दिशाही बदलण्याची मागणी होत होती. अखेर पालिकेने पुतळ्याची दिशा मुख्य प्रवेशद्वारासमोर केली असून आता उद्यानात प्रवेश केल्यानंतर लागलीच पंडित नेहरू यांचा पुतळा नागरिकांना पाहता येणार आहे.
सात कोटी खर्चून उद्यानाचे नूतनीकरण
उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे. अंबरनाथ नगरपालिकेने तब्बल सात कोटी खर्च करून या नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे केवळ पुतळ्याचे नव्हे तर संपूर्ण उद्यानालाही देखणे स्वरूप प्राप्त होणार आहे.