नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण; ऑनलाइन पार पडणार सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 03:12 AM2021-01-25T03:12:44+5:302021-01-25T03:13:05+5:30
कमांड सेंटरमध्ये या बाबी हाताळण्यासाठी मोठी व्हिडीओ वॉल उभारली असून त्यावर विविध सॉफ्टवेअर प्रणालींद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे.
कल्याण : स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्र व राज्य सरकार आणि केडीएमसी यांनी उभारलेल्या स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण सोमवारी दुपारी १.१५ च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी ऑनलाईन पद्धतीने दुपारी ११.४५ वाजता बहुचर्चित नवीन पत्रीपुलाचे लोकार्पणही ठाकरे यांच्या हस्ते होईल.
स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर बसविले असून सर्व स्मार्ट प्रणालींचे एका ठिकाणाहून नियंत्रण करणारी ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहरातील सुरक्षा नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापनात घंटागाडी वा कचरा गाडीचा मागोवा घेणे, ड्रोनद्वारे पायाभूत सुविधा व्यवस्थापन, ट्रॅफिक सिग्नलचे निरीक्षण व व्यवस्थापन, राज्य सरकारच्या ई-चलनप्रणाली सोबत एकत्रिकरण, स्वयंचलित नंबर प्लेट डिटेक्शन व रेड लाइट उल्लंघन शोधकॅमेऱ्याचे नियंत्रण व व्यवस्थापन, एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली, एलईडी पथदिवे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, चल संदेश बोर्ड व्यवस्थापन, सार्वजनिक सूचना प्रणाली आदी बाबी कमांड सेंटरद्वारे हाताळल्या जाणार आहेत.
कमांड सेंटरमध्ये या बाबी हाताळण्यासाठी मोठी व्हिडीओ वॉल उभारली असून त्यावर विविध सॉफ्टवेअर प्रणालींद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. या विविध प्रणाली हाताळण्यासाठी वर्कस्टेशन व ऑपरेटर यांची व्यवस्था केली आहे. त्यात स्वागतकक्ष, मिटिंग व ट्रेनिंग रूम आणि वॉर रूमचा अंतर्भाव आहे. या सुविधा उपलब्ध होणार असून ही यंत्रणा हाताळण्यासाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधेची उपलब्धता डाटा सेंटरमध्ये केलेली आहे.
कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन
स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्थानक परिसर सुधारणा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यात रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे वाहतूक मार्ग वेगवेगळे करण्यासाठी बैलबाजार चौक ते सुभाष चौक असा उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. अस्तित्वातील बस डेपोची इमारत व कार्यशाळा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार असून या इमारतीवर भव्य वाहनतळ तसेच वाणिज्य संकुल उभारण्यात येणार आहे. रेल्वेस्थानक परिसरातील अपुरी वाहनतळ व्यवस्था विचारात घेऊन सध्याचे मनपाच्या वाहनतळाचाही पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्यात रेल्वेस्थानक परिसरात सुमारे २५० चारचाकी वाहने व दीड ते दोन हजार दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानकाकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या पादचारी पुलाची दुरुस्ती तसेच स्वयंचलित जिने बसवण्यात येणार आहेत. या सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी १२.४५ च्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.